

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला 3 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. दरम्यान यासाठी भारतीय संघ सोमवारी अमेरिकेसाठी रवाना झाला. भारताचे पहिले दोन टी-20 सामने अमेरिकेत होणार आहेत. टी-20 बरोबरच भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.


दरम्यान, भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी विराटनं पत्रकार परिषद घेतली. यावेळी विराटनं बहुचर्चित अशा रोहितसोबतच्या वादावर पहिल्यांदा भाष्य केले.


विराटने पत्रकार परिषदेत, "या अशा चर्चा होत आहेत हेच दुर्दैवी आहे. आम्ही खुप चांगले मित्र आहोत, तो जेव्हा चांगलं खेळतो तेव्हा मी त्याचे कौतुक करतो. या सगळ्या खोट्या बातम्या आहेत", असे सांगत रोहितवादावर पडदा टाकला.


मात्र, असे असले तरी भारतीय संघ अमेरिकेला रवाना होण्याआधी विराट आणि रोहित या दोघांनी सोशल मीडियावर आपल्या सहकाऱ्यांसोबत फोटो टाकले. दरम्यान, विराटनं टाकलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाचे युवा खेळाडू आहेत मात्र उपकर्णधार रोहित शर्मा नाही आहे. त्यामुळं चाहत्यांनी अजूनही वाद आहेतच का?, असा सवाल केला आहे.