भारताची एक क्रिकेट टीम सध्या इंग्लंडमध्ये तर दुसरी श्रीलंकेत आहे. इंग्लंडमध्ये असलेला टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) याला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी श्रीलंकेत असलेल्या पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) इंग्लंडला बोलावलं जाऊ शकतं असं वृत्त आहे. पृथ्वी शॉ जर इंग्लंडला गेला तर श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठी कोण ओपनिंगला खेळणार हा प्रश्न आहे. यासाठी राहुल द्रविड आणि शिखर धवन यांच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
पृथ्वी शॉ इंग्लंडला गेला तर त्याच्याऐवजी संजू सॅमसनला (Sanju Samson) ओपनिंगला संधी मिळू शकते. टी-20 क्रिकेटमध्ये सॅमसनने अनेकवेळा ओपनिंग केली आहे, त्यामुळे त्याला वनडेमध्येही त्याचा पर्याय उपलब्ध आहे. संजू सॅमसन सध्या फॉर्ममध्येही आहे. आयपीएल 2021 मध्ये 7 सामन्यांमध्ये त्याने 46 च्या सरासरीने 375 रन केले. टीम इंडियाकडून खेळलेल्या 7 टी-20 मॅचमध्ये मात्र त्याला फक्त 12 च्या सरासरीने 83 रन करता आल्या. श्रीलंका दौऱ्यात ओपनिंगला खेळण्याची संधी मिळाली तर त्याला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल.
इशान किशनही (Ishan Kishan) पृथ्वी शॉला ओपनरचा पर्याय असू शकतो. डावखुऱ्या इशान किशनने 2 टी-20 मॅचमध्ये 60 रन केले आहेत. आपल्या पहिल्याच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने अर्धशतक करून मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. किशनने ओपनर म्हणूनच अर्धशतक केलं होतं. लिस्ट ए करियरमध्ये त्याने 37 च्या सरासरीने 2,549 रन केले आहेत.
डावखुऱ्या देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) विजय हजारे ट्रॉफीपासून ते आयपीएलमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. लिस्ट एमध्ये पडिक्कलने 20 मॅचमध्ये 86.68 च्या सरासरीने 1,387 रन केले, यात 6 शतकं आहेत. तर टी-20 मध्ये त्याने 43.11 च्या सरासरीने 1,466 रन बनवले आहेत. पडिक्कलचा स्ट्राईक रेटही 145 पेक्षा जास्त आहे.