

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही क्रिकेट सामना हा स्पर्धेच्या फायनलपेक्षा महत्त्वाचा असतो. क्रिकेटच्या इतिहासात 23 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 9 मार्च 1996 ला वर्ल्डकपमध्ये बेंगळुरुमध्ये चेन्नास्वामी स्टेडियमवर भारत-पाक सामना झाला होता.


भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 287 धावा केल्या होत्या. नवज्योतसिंग सिद्धूने 93 धावा तर अजय जडेजाने शेवटच्या षटकांमध्ये वेगवान 40 धावा केल्या होत्या. तेव्हा जडेजाने वकार युनूसच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली होती.


भारताने दिलेल्य़ा 288 धावांचा पाठलाग करताना पाकचा सईद अन्वर लवकर बाद झाला. त्यानंतर आमिर सोहेलने एक बाजू सांभाळत फटकेबाजी सुरू ठेवली. यामुळे सामना भारताच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.


भारतीय गोलंदाज व्यंकटेश प्रसाद 15 वे षटक टाकले. त्यावेळी आमिर सोहेलने चौथ्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर बॅटने तुझी जागा सीमारेषेच्या बाहेर अशा अर्थाने व्यंकटेशला इशारा करून डिवचले.


यावर शांत स्वभावाच्या व्यंकटेश प्रसादने सोहेलच्या या वागण्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याने पुढचा चेंडू असा टाकला की आमिर सोहेलला कळायच्या आत ऑफ स्टंप उडाली होती. त्यानंतर भारताने सामन्यावर पकड मिळवली.