आर.अश्विन (R Ashwin) टेस्ट क्रिकेटमधला बऱ्याच काळापासून भारताचा सर्वोत्तम बॉलर आहे. जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळल्यानंतर आता अश्विन पुन्हा एकदा टेस्ट खेळण्यासाठी किवींविरुद्धच (India vs New Zealand) मैदानात उतरणार आहे. अश्विनने गेल्या काही वर्षांमध्ये न्यूझीलंडला बराच त्रास दिला आहे. टेस्टमध्ये अश्विनच्या नावावर न्यूझीलंडविरुद्ध 52 विकेट आहेत. हे आकडे अश्विनला केन विलियसमनच्या टीमविरुद्ध भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलरपैकी एक ठरवतात.
अश्विनने टेस्टमध्ये केन विलियसमनला (Kane Williamson) 5 वेळा आऊट केलं आहे, याबाबत त्याने भारताचा माजी स्पिनर प्रग्यान ओझाची बरोबरी केली आहे. या सीरिजमध्ये अश्विनने विलियसमनची एकदा विकेट घेतली तर तो ओझाच्या पुढे जाईल आणि किवी कर्णधाराला सर्वाधिक वेळा आऊट करण्याचा रेकॉर्ड करेल. विलियसमनची विकेट घेण्यासाठी अश्विनकडे 4 इनिंग आहेत.
अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 79 सामने खेळून 24.56 च्या सरासरीने 413 विकेट घेतल्या. हरभजन सिंगचं (Harbhajan Singh) 417 विकेटचं रेकॉर्ड मोडण्यासाठी अश्विनला 5 विकेटची गरज आहे. भारताकडून सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अनिल कुंबळे 619 विकेटसह पहिल्या क्रमांकावर आणि कपिल देव 434 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
अश्विनने 7 वेळा मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून टेस्ट क्रिकेटमधली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. या यादीत अनिल कुंबळे (Anil Kumble) दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनिल कुंबळेने 8 वेळा सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळेच्या या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी अश्विनला आणखी एका 10 विकेटची गरज आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरुवात होईल. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या टीमचा कर्णधार असेल कारण विराट कोहलीला (Virat Kohli)विश्रांती देण्यात आली आहे. सीरिजची दुसरी टेस्ट 3 डिसेंबरपासून मुंबईमध्ये सुरू होईल, या टेस्टसाठी विराटचं टीममध्ये पुनरागमन होईल.