विराट कोहलीची (Virat Kohli) चुकीचा डीआरएस (DRS) घेण्याची चूक पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली. इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या दिवशीही विराटने पुन्हा एकदा तिच चूक केली. याआधीही विराट कोहलीवर डीआरएसमुळे अनेकवेळा टीका झाली आहे. विराट आणि डीआरएस यांच्यात 36 चा आकडा आहे, असंच म्हणावं लागेल.
लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) टाकलेला बॉल जो रूटच्या (Joe Root) पॅडला लागला, यानंतर खेळाडूंनी एलबीडब्ल्यूसाठी (LBW) अपील केलं. अंपायरने रूटला नॉट आऊट दिलं, यानंतर सिराजच्या सांगण्यावरून विराटने डीआरएस घेतला, पण टीमच्या पदरी निराशा आली आणि एक रिव्ह्यू फुकट गेला.
विराट कोहलीला रिव्ह्यू घेताना अडचणींचा सामना करावा लागतो, पण भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) मात्र याबाबतीत कायमच यशस्वी ठरायचा. धोनीचे निर्णय इतके योग्य असायचे की त्याचे चाहते DRS ला धोनी रिव्ह्यू सिस्टीम म्हणायचे. कोहली बराच काळ धोनीसोबत खेळला, तरीही डीआरएस घेताना विराट एवढा अपयशी का ठरतो, असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे.