

भारताच्या अंडर19 टीमनं वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये धडाकेबाज एन्ट्री केली आहे. मंगळवारी झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर 299 धावांचं लक्ष्य ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 159 धावांतच कोसाळला. यावेळी यशस्वी जायसवालने 62 धावांची आणि अथर्व अंकोलेकरने नाबाद 55 धावांची दमदार खेळी केली. तर, कार्तिक त्यागीने 4 आणि आकाश सिंहने 3 विकेट घेत सेमीफायनलच्या तिकीटावर टीम इंडियाचं नाव कोरलं. दरम्यान, अंडर19 टीमनं ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत अनेक मोठ्या किमया साधल्या आहेत.


ऑस्ट्रेलियाला नमवत भारताच्या अंडर19 टीमनं सलग दहावा विजय साजरा केला आहे. सलग 10 विजय मिळवणारी भारताची अंडर19 टीम ही विश्वातील पहिली टीम आहे. याचवेळी भारतानं ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रमही मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियानं 2002 ते 2004 या कालावधीत 9 सामने जिंकले होते. भारतानं सलग 10 सामने जिंकत आता हा विक्रम आपल्या नावे केला आहे.


भारताने अंडर19 युथ क्रिकेटमध्ये 200 विजय मिळवले आहेत. या विजयामुळेही भारताचा अंडर19 संघ हा विश्वातील एकमेव संघ आहे. भारतानं 261 सामन्यांपैकी 200 सामन्यात विजय मिळवला आहे तर, 56 सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे. दोन सामने बरोबरीत असून तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.


भारतीय संघानं सातव्यांदा ICC अंडर19 क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून हा देखील एक विश्वविक्रम आहे. याआधी भारतानं 2000, 2004, 2006, 2012, 2016 आणि 2018 या वर्षी सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला होता.