टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये (IND vs ENG 5th Test) 7 विकेटने लाजिरवाणा पराभव झाला. याचसोबत दोन्ही देशांमधली 5 टेस्ट मॅचची सीरिज 2-2 ने बरोबरीत सुटली. एजबॅस्टनमध्ये झालेल्या सीरिजच्या शेवटच्या टेस्टमध्ये भारताने इंग्लंडला 378 रनचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान इंग्लंडने फक्त 3 विकेट गमावून पार केलं.
भारताने पहिल्या इनिंगमध्ये 416 रन केल्या, यानंतर इंग्लंडचा 284 रनवर ऑल आऊट झाला. भारतीय टीमने दुसऱ्या इनिंगमध्ये 245 रन केले, ज्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 378 रनचं आव्हान मिळालं. जो रूट आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात नाबाद 269 रनची पार्टनरशीप झाली. रूटने 142 तर बेयरस्टोने 114 रन केले. भारताच्या या पराभवाला 6 खेळाडू जबाबदार ठरले.
मागच्या अडीच वर्षांपासून एकही शतक करू न शकलेला विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यातही संघर्ष करताना दिसला. पहिल्या इनिंगमध्ये मॅथ्यू पोट्सने विराटला बोल्ड केलं. 19 बॉलमध्ये 2 फोरच्या मदतीने 11 रन करून विराट पॅव्हेलियनमध्ये गेला. तर दुसऱ्या इनिंगमध्ये बेन स्टोक्सने 20 रनवर विराटला आऊट केलं. जो रूटने त्याचा कॅच पकडला. विराटने या सामन्यात एकूण 31 रन केले.
केएल राहुलला दुखापत झाल्यामुळे शुभमन गिलला (Shubhaman Gill) संधी मिळाली, पण त्याला याचा फायदा करून घेता आला नाही. दोन्ही इनिंगमध्ये गिलने ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, यात तो स्लिपमध्ये कॅच देऊन बसला. दोन्ही वेळा जेम्स अंडरसनच्या बॉलिंगवर जॅक क्राऊलीने गिलचे कॅच पकडले. गिलने पहिल्या इनिंगमध्ये 17 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 17 रन केले.
फास्ट बॉलर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) पाचव्या दिवसाची पहिली ओव्हर टाकली, यावरून टीम इंडियाच्या रणनितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. सिराजने पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्या, पण यातल्या 2 तर तळाचे बॅट्समन होते. सिराजने 11.4 ओव्हरमध्ये 66 रन दिले, म्हणजेच त्याने जवळपास 6 रन प्रती ओव्हरच्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. दुसऱ्या इनिंगमध्ये सिराजला एकही विकेट मिळाली नाही आणि त्याने 6.53 च्या इकोनॉमी रेटने रन दिले. सिराजच्या बॉलिंगवर दुसऱ्या इनिंगमध्ये 15 ओव्हरमध्ये 98 रन आले.
शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) या सामन्यात बॅटिंग करू शकणारा फास्ट बॉलर म्हणून संधी देण्यात आली होती, पण यातल्या दोन्हीमध्ये तो अपयशी ठरला. शार्दुलने पहिल्या इनिंगमध्ये 1 रन केली आणि 1 विकेट मिळवली, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 26 बॉलचा सामना करून 4 रन केले. यानंतर त्याने 11 ओव्हरमध्ये 65 रन दिल्या, तसंच त्याला विकेटही मिळाली नाही.