

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं विंडीजविरुद्ध सलग दुसरं शतक झळकावलं. या शतकासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं नाबाद 114 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतानं सामन्यासह एकदिवसीय मालिका 2-0 ने जिंकली.


कर्णधार म्हणून सर्वात वेगवान 10 हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीनं केला आहे. त्यानं 176 डावात हा पल्ला गाठला. रिकी पाँटिंगनं 225 डावात 10 हजार धावा केल्या होत्या.


विराटनं कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 21 वं शतक केलं. रिकी पाँटिंगच्या विक्रमापासून एक शतक दूर आहे. विराटने 76 सामन्यात 21 शतकं तर पाँटिंगनं 220 डावात 22 शतकं केली आहेत.


विडीजविरुद्ध विराटचं हे सलग तिसरं शतक आहे. 2017 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 111 धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडीजमध्ये सलग तीन शतकं करणारा विराट जगातील पहिला फलंदाज आहे.


तिसऱ्या सामन्यातील शतकासह विराट कोहलीनं भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानं वेस्ट इंडीजविरुद्ध 9वे शतक साजरं केलं. एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतकं केली आहेत.