शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) गेली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. 13 जुलैलला वनडे सीरिजपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. टीमचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे टीम इंडियामध्ये नवोदितांना संधी देण्यात आली आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याच्यामते हा दौरा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादवसाठी (Kuldeep Yadav) महत्त्वाचा ठरणार आहे. 'वनडे सीरिजमध्ये या दोघांना संधी दिली पाहिजे, कारण ते जेवढ्या ओव्हर जास्त टाकतील, तेवढा त्यांच्या आत्मविश्वास वाढेल, खासकरून कुलदीपचा,' असं लक्ष्मण स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला. कुलदीप आणि चहलची कामगिरी गेल्या काही काळात निराशाजनक राहिली आहे.
डावखुरा स्पिनर कुलदीप यादवने 63 वनडे सामन्यांमध्ये 105 विकेट घेतल्या आहेत. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या दोन वनडेमध्ये त्याला संधी मिळाली, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. अखेरच्या 10 मॅचमध्ये कुलदीपला फक्त 9 विकेट घेता आल्या. खराब कामगिरीमुळे त्याला या मोसमात केकेआरने एकही आयपीएल मॅच खेळवली नाही.