भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने मारलेला चेंडू अडवताना श्रीलंकेचे दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकले. श्रीलंकेचे क्रिकेटपटू अशेन बंडारा आणि वँडरसे यांना एकमेकांना धडकल्यामुळे दुखापत झाली आहे. यामुळे दोघांनाही मैदान सोडावं लागलं. सीमारेषेवर चेंडू अडवत असताना अशेन बंडारा वँडरसेला जोरात धडकला. यात त्यानतंर श्रीलंकेचे फिजिओ मैदानात आले. खेळाडूंसोबत चर्चा केल्यानतंर स्ट्रेचर आणण्यात आले. बंडारा आणि वँडरसेला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं. चेंडू अडवत असताना बंडाराचा पाय वँडरसेच्या पोटाला जोरात लागला. तर बंडाराच्या मानेला मार लागला. यानंतर काही काळ सामना थांबवण्यात आला होता. अशेन बंडारा आणि वँडरसे यांना मैदानाबाहेर नेण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, मैदानावर घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत होती.