शिखर धवन : टीममधल्या वरिष्ठ खेळाडूंपैकी एक असलेल्या शिखर धवनची टी-20 वर्ल्ड कपमध्ये निवड होईल हे निश्चित आहे. पण मागच्या काही काळापासून टी-20 मध्ये रोहित शर्मासोबत केएल राहुल ओपनिंगला खेळतो. आता या जागेवर पृथ्वी शॉनेही दावा केला आहे, त्यामुळे आपली जागा पक्की करण्यासाठी धवनला आपल्या नेतृत्वासोबतच कामगिरीही उत्कृष्ट करावी लागणार आहे. शिखर धवनने 65 सामन्यांमध्ये 27.88 च्या सरासरीने आणि 127.41 च्या स्ट्राईक रेटने 1,673 रन केले आहेत.
युझवेंद्र चहल : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) फॉर्ममध्ये नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका टी-20 मॅचमध्ये चहलने आपल्या कामगिरीवर विजय मिळवून दिला, पण यानंतर त्याला सातत्य दाखवता आलं नाही. पहिले इंग्लंडविरुद्ध आणि मग आयपीएलमध्ये चहलने निराशाजनक कामगिरी केली. आता श्रीलंका दौऱ्यात चहलला कामगिरी सुधारण्याची संधी आहे. कारण श्रीलंका दौराही खराब गेला तर टीममध्ये येण्यासाठी अनेक युवा खेळाडू तयार आहेत. चहलने 48 टी-20 मध्ये 8.40 च्या सरासरीने 62 विकेट घेतल्या आहेत.
कुलदीप यादव : एकेकाळची टीम इंडियाची हिट जोडी म्हणजेच युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav), पण चहलप्रमाणेच कुलदीपही खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएलमध्येही कुलदीपला केकेआरने एकाही सामन्यात संधी दिली नाही. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये कुलदीपला संधी मिळाली होती, पण त्याला यश मिळालं नाही. कुलदीपसाठी श्रीलंका दौरा करो या मरो ठरणार आहे. कुलदीपने 21 टी-20 मध्ये 7.11 च्या सरासरीने 39 विकेट घेतल्या.
मनिष पांडे : श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी केली तर मनिष पांडेची (Manish Pandey) टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होऊ शकते. आयपीएल 2021 मध्ये मनिष पांडे अपयशी ठरला, एवढच नाही तर त्याला हैदराबादने काही सामने बाहेरही बसवलं होतं. आयपीएलच्या 5 सामन्यांमध्ये मनिष पांडेने 193 रन केले होते. तर आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये त्याने 44.31 च्या सरासरीने 709 रन केले आहेत. मनिष पांडे बराच काळ टीम इंडियासोबत असला तरी त्याला खेळण्याची फार संधी मिळालेली नाही, त्यामुळे लंकेत खेळायला मिळालं, तर तो या संधींचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
संजू सॅमसन : विकेट कीपर असलेल्या संजू सॅमसनला (Sanju Samson) टीम इंडियामध्ये फार संधी मिळाली नाही. आयपीएल 2021 प्रमाणेच सॅमसनने श्रीलंकेत कामगिरी केली तर त्याला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळेल. आयपीएलच्या या मोसमात त्याने 7 मॅचमध्ये 227 रन केले आहेत. भारताकडून संजू सॅमसनला 7 टी-20 खेळण्याची संधी मिळाली, यात त्याने 11.85 ची सरासरी आणि 118.57 च्या स्ट्राईक रेटने 83 रन केले आहेत.
सूर्यकुमार यादव : संजू सॅमसनच्या जागेला सर्वाधिक धोका सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पासून आहे कारण त्याने मागचा बराच काळ स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही सूर्यकुमार जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने भारताकडून खेळलेल्या 3 टी-20 मॅचमध्ये 44.50 च्या सरासरीने आणि 185.41 च्या स्ट्राईक रेटने 89 रन केले, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
हार्दिक पांड्या : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर असलेल्या हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) शस्त्रक्रियेनंतर बॉलिंग केलेली नाही. बॉलिंग करत नसल्यामुळेच हार्दिकची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली नाही, पण श्रीलंका दौऱ्यात त्याला संधी देण्यात आली आहे. हार्दिकने भारतासाठी 48 टी-20 मॅचमध्ये 19.75 च्या सरासरीने 147.66 च्या स्ट्राईक रेटने 474 रन केले आहेत, तसंच त्याने 8.17 च्या इकोनॉमी रेटने 41 विकेटही घेतल्या आहेत.