विराटऐवजी आता रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचा नवा कर्णधार असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) तीन टी-20 मॅचच्या सीरिजपासून रोहित नव्या भूमिकेत दिसेल. तसंच टी-20 सीरिजनंतर भारत आणि न्यूझीलंड 2 टेस्ट मॅचची सीरिजही खेळणार आहे. या दोन्ही सीरिजमध्ये भारताच्या 6 खेळाडूंची अग्नीपरीक्षा असेल, यावेळी जर त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही, तर त्यांच्या करियरला कायमचा ब्रेक लागू शकतो.
भुवनेश्वर कुमार : 2021 हे वर्ष भुवनेश्वर कुमारसाठी (Bhuvneshwar Kumar) निराशाजनक ठरलं. पहिल्या सहा महिन्यांमध्ये भुवी दुखापतींमुळे त्रस्त होता, ज्यामुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित झाले. यानंतर त्याने टीम इंडियात पुनरागमन केलं, पण त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. आयपीएल 2021 च्या 11 सामन्यांमध्ये त्याला फक्त 6 विकेट घेता आल्या. टी-20 वर्ल्ड कपमधल्या कामगिरीने तर भुवनेश्वरसमोरच्या चिंता आणखी वाढल्या. न्यूझीलंडविरुद्धची सीरिज भुवनेश्वर कुमारसाठी करो या मरो ठरू शकते. कारण निवड समितीसमोर फास्ट बॉलिंगचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
अक्षर पटेल : अक्षर पटेलसाठी (Axar Patel) 2021 वर्षाची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये अक्षरने उत्कृष्ट कामगिरी केली. रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे अक्षर पटेलला खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतानाही त्याने स्वत:ला सिद्ध केलं. 12 सामन्यांमध्ये त्याने 15 विकेट घेतल्या. तरीही अक्षर पटेलचं टीममधलं स्थान अनिश्चित आहे. अक्षर पटेलला रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि व्यंकटेश अय्यर यांच्याकडून स्पर्धा आहे.
अजिंक्य रहाणे : अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये चांगली कामगिरी करावी लागली आहे. कारण मागच्या दोन वर्षांपासून रहाणेच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला, ज्यामुळे त्याचं टेस्ट टीममधलं स्थान धोक्यात आलं आहे. मागच्या वर्षी मेलबर्नमध्ये शतक केल्यानंतर रहाणेला मोठी खेळी करता आलेली नाही. मेलबर्न टेस्टनंतर रहाणेने 11 टेस्टमध्ये फक्त 19 च्या सरासरीने 372 रन केले. 2020 च्या सुरूवातीपासून रहाणेने 27 टेस्ट इनिंगमध्ये 24.76 च्या सरासरीने 644 रन केले, यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
ऋद्धीमान साहा : ऋद्धीमान साहाचं (Wriddhiman Saha) वय 37 वर्ष आहे. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर साहाने टेस्ट क्रिकेटमध्ये काही काळ विकेट कीपिंग केली, पण ऋषभ पंतच्या उदयानंतर साहाला फार खेळण्याची संधी मिळाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऋषभ पंतला आराम देण्यात आला आहे, पण साहासोबत केएस भरत या युवा विकेट कीपरही टीममध्ये आहे. भरतला तयार करण्यासाठी साहाला पुन्हा एकदा बेंचवर बसावं लागू शकतं.
आर.अश्विन : 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अश्विनला (R Ashwin) वनडे आणि टी-20 क्रिकेटमधून डच्चू देण्यात आला, पण टी-20 वर्ल्ड कपवेळी अश्विनचं टीम इंडियात पुनरागमन झालं. आयपीएलमध्ये चांगलं रेकॉर्ड असूनही अश्विनला टीममधून बाहेर करण्यात आलं. वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यामुळे अश्विन टीममध्ये आला. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही अश्विनला संधी देण्यात आली आहे. यात त्याला स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे. अन्यथा सुंदर फिट झाल्यास अश्विनला पुन्हा बाहेर बसावं लागू शकतं.
चेतेश्वर पुजारा : अजिंक्य रहाणेप्रमाणेच चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) कामगिरीमध्येही उतार-चढाव पाहायला मिळाले. पुजाराच्या संथ बॅटिंगवरही वारंवार टीका करण्यात आली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने पुजारा आणि रहाणेवर निशाणा साधला होता. खेळाडूची मानसिकता रन करणं आणि रन करण्याचा फॉर्म्युला शोधून काढणं असलं पाहिजे. तुम्ही आऊट व्हायची भीती बाळगून खेळू शकत नाही, असं विराट म्हणाला होता.