भारतीय टीमने (Team India) आपली पहिली टेस्ट मॅच 89 वर्षांपूर्वी 1932 साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळली. पण 1970 च्या दशकात भारताला मोठ्या टीमविरुद्ध जिंकता येऊ लागलं. असं असलं तरी टीमची परदेशातील कामगिरी निराशाजनक होत होती. 1983 सालचा वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही पहिली 67 वर्ष भारतीय टीमचं परदेशातलं रेकॉर्ड खराब होतं. 1932 ते 1999 पर्यंत भारताला परदेशात फक्त 13 टेस्ट मॅच जिंकता आल्या. या काळात भारताने परदेशात तब्बल 155 टेस्ट खेळल्या. आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात मात्र भारतीय टीम पूर्णपणे बदलली आहे.
सौरव गांगुलीने टीम इंडियाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर भारताची परदेशातली कामगिरी सुधारली. भारताने परदेशात आतापर्यंत 53 टेस्ट जिंकल्या, यातल्या 40 टेस्ट 2000 नंतरच्या आहेत. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीमला जास्त यश मिळालं. विराटकडे 2014 च्या शेवठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीमचं नेतृत्व मिळालं. 2015 पासून भारताने परदेशी खेळपट्टीवर 32 पैकी 15 टेस्ट जिंकल्या, यात श्रीलंकेत 5, वेस्ट इंडिजमध्ये 4, ऑस्ट्रेलियात 4, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत एक-एक विजय आहेत.
भारताने 1932 ते 1999 पर्यंत 330 टेस्ट खेळल्या, यात भारताचा 109 सामन्यांमध्ये पराभव झाला आणि 61 टेस्ट जिंकता आल्या, पण 2000 नंतर चित्र बदललं. सौरव गांगुली, एमएस धोनी, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि विराट कोहली भारतीय टेस्ट टीमचे कर्णधार होते. 2000 पासून भारताने 220 टेस्ट खेळल्या, यातल्या 101 सामन्यांमध्ये भारत जिंकला, तर 60 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.