

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आयसीसी रँकिंगमध्ये जगातील अव्वल महिला फलंदाज ठरली आहे.


न्यूझीलंड दौऱ्यावर तिने जबरदस्त कामगिरी केली होती. दुसऱ्या सामन्यात तिने नाबाद 90 धावांची खेळी केली होती. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर आयसीसीने जाहिर केलेल्या क्रमवारीत स्मृती जगातील सर्व महिला क्रिकेटपटूंना मागे टाकत बॅटसवूमन झाली आहे.


याआधी तिने महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ वर्षांच्या स्मृती मानधनाने धमाकेदार अर्धशतकी खेळी करताना अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते.


स्मृतीने ऑस्टेलियाविरुद्धच्या सामन्यात ५५ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकार लगावत ८३ धावा केल्या. भारताने १६७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मध्ये भारताची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.


मानधनाचं हे टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं सहावं अर्धशतक आहे. मानधनाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्य महिला क्रिकेट संघाविरुद्ध प्रत्येकी दोन अर्धशतकं ठोकली आहेत.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८३ धावांमध्ये मानधनाने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पाही पार केला. १ हजार धावांचा टप्पा पार करणारी मानधनाही तिसरी भारतीय महिला क्रिकेटर आहे. मानधनाच्याआधी मिताली राज आणि हरमनप्रीत कौरने १ हजार धावा केल्या आहेत. मानधनाने ५१ सामन्यांमध्ये हा टप्पा पार केला. यात तिने हरमनप्रीत कौरला मागे टाकले असले तरी मिताली राजला ती मागे टाकू शकली नाही.


स्मृतीने ३१ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये हे सर्वात जलद अर्धशतक आहे. याआधी हरमनप्रीतने याच वर्ल्डकपमध्ये न्युझीलँडविरुद्ध १०३ धावा केल्या. हरमनप्रीतने ३३ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तर २०१० मध्ये मिताली राजने श्रीलंकेविरुद्ध ३६ चेंडूत अर्धशतक साजरे केले होते.