

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारत वगळता इतर सर्व संघांनी एक-एक सामना खेळला आहे. तरी, भारतीय संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. दरम्यान भारताचा पहिला सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. मात्र विराट पुढे संकट आहे ते प्लेईंग इलेव्हनचे.


विराट कोहलीला मैदानाचा आणि पिचचा अंदाज घेऊन आपल्या 11 शिलेदारांची निवड करावी लागणार आहे. त्यामुळं कोणत्या 11 खेळाडूंना संघात स्थान मिळणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सामना होणाऱ्या साऊथहैंपटन मैदानावर बुधवारी ढगाळ वातावरण असू शकते. त्यामुळं भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळू शकते. त्यामुळं भारतीय संघ इंग्लंडच्या फ्लॅट पीचवर तीन जलद गोलंदाज आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत खेळू शकतो.


पण जर भुवनेश्वर कुमारला संघात स्थान दिले तर, विराटसाठी कॉम्बिनेशन तयार करणे कठीण जाऊ शकते. यासाठी त्याला केदार जाधव किंवा रविंद्र जडेजा यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते.


दरम्यान न्युझीलंड विरुद्धच्या सराव सामन्यात रविंद्र जडेजानं गोलंदाजी आणि फलंदाजी यांच्यासह चांगली खेळी केली होती. त्यामुळं त्याला संघात स्थान मिळू शकते.


तर, दुसरीकडे केदार जाधव फिट झाल्यामुळं विराटच्या अडचणी अजून वाढल्या आहेत. केदार जाधव दुखापतींमुळं एकही सराव सामना खेळू शकला नव्हता. त्यामुळं त्याच्या नावाची चर्चा असली तरी, त्याला संधी मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे.