

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 30 मे पासून सुरु असून भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार यावर चर्चा थांबायला तयार नाही. क्रिकेट चाहत्यांपासून समीक्षकांपर्यंत अनेकांनी यावर मत व्यक्त केलं आहे.


चौथ्या क्रमांकावर धोनीने खेळावं असं काही जण म्हणतात तर काहींनी केएल राहुल आणि दिनेश कार्तिक या दोघांचे नाव सुचवलं आहे.


भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी वर्ल्ड कपमध्ये भारताने केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवलं पाहिजे असं म्हटलं आहे. त्याच्याकडे असलेल्या कौशल्याचा इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर फायदा होईल.


वेंगसरकर म्हणाले की, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला सेमीफायनलला पोहचणं कठिण नाही. मात्र, तिथून पुढे भारतीय संघासमोर आव्हान असेल.


शिखर धवन आणि रोहित शर्मा ही सलामीची जोडी आणि तिसऱ्या नंबरवर विराट कोहली सक्षम आहेत. तर चौथ्या नंबरवर केएल राहुल योग्य पर्याय ठरू शकतो असं वेगसरकर यांनी सांगितलं.