

30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला विजेतेपदाचा दावेदार मानलं जात आहे. भारताचा हिटमॅन रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणाऱ्या रोहित शर्माला भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रम खुणावत आहे.


सध्या इंग्लंडची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. इथं एका सामन्यात 500 धावाही होऊ शकतात. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात 150 पेक्षा जास्त धावा सातवेळा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 264 धावांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.


रोहित शर्माच्या वर्ल्ड कपमध्ये वैयक्तिक सर्वाधिक 137 धावा या आहेत. त्याच्याबरोबरीने शिखर धवननेसुद्धा 137 धावांची खेळी केली होती. दोघांनीही 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये ही कामगिरी केली होती.


भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये दोन शतकांची नोंद आहे. त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या 107 इतकी आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा 183 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.


वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दोन फलंदाजांनी द्विशतक करण्याची कामगिरी केली आहे. यात न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने नाबाद 237 तर वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने 215 धावा केल्या होत्या.


दर चार वर्षांनी होणाऱ्या क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दोन द्विशतकं झाली आहेत. पण भारताकडून सौरभ गांगुलीने 199 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 183 धावा केल्या होत्या. त्यानंतर फक्त दोन वेळा भारतीय फलंदाजांनी वर्ल्ड कपमध्ये दीडशेचा टप्पा पार केला आहे.