

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द झाला. पावसामुळे सामना रद्द होण्याची वर्ल्ड कपमधील ही चौथी वेळ आहे. आतापर्यंत सर्वाधिक सामने रद्द होणारा वर्ल्ड कप ठरला आहे.


इंग्लंडमध्ये सध्या अचानक वातावरणात बदल झाला असून जून महिन्यात पडणाऱ्या पेक्षा जास्त पावसाची नोंद यावेळी झाली आहे. याचा फटका वर्ल्ड कपमधील सामन्यांना बसत आहे.


चार पैकी दोन सामन्यात श्रीलंकेला पावसाने दणक दिला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धचे त्यांचे सामने एकही चेंडू न खेळता रद्द झाले.


याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील साउथॅम्पटनवरील सामना 7.3 षटके खेळल्यानंतर रद्द करण्यात आला होता.


भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 3 वाजता सुरू होणार होता. मात्र, पावसामुळे 4.30 वाजता पुढचा निर्णय घेण्यात येणार होता. पण तरीही पाऊस न थांबल्याने अखेर सामना रद्द करावा लागला.


वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने 3 सामन्यातील विजयासह अव्वल स्थान पटकावले आहे. भारताविरुद्धचा सामना रद्द झाल्याने एक गुण मिळाला. त्या खालोखाल ऑस्ट्रेलिया 6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत दोन विजय आणि पावसाने रद्द झालेल्या सामन्यातील एक गुण असे मिळून 5 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.


जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडने तीन पैकी दोन सामने जिंकले असून 4 गुणांसह ते चौथ्या स्थानावर आहेत. लंकेने एका सामन्यात विजय, दोन सामने पावसामुळे वाया गेले. तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला.


वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचे तीन गुण झाले आहेत. या तीनही संघांना पावसाचा फटका बसला आहे. हे संघ अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत. दक्षिण आफ्रिकेला तीन पराभव पत्करावे लागले त्यानंतर एका सामन्यात पावसाने त्यांना एक गुण मिळाला. अफगाणिस्तानला अद्याप खाते उघडता आलेले नाही.