

इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ पोहोचला आहे. वर्ल्ड कपमध्ये सहभागी संघात भारतीय संघ सर्वात संतुलित संघ आहे. भारताकडे रोहित शर्मा आणि शिखर धवनसारखे सलामीवीर आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूंवरच भारताची मदार आहे.


2007 ला भारतीय संघात पदार्पण केलेल्या रोहित शर्माला 2011 च्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळालं नव्हतं. त्याने याबाबत आपल्याला दु:ख झाल्याचं म्हटलं.


2011 च्या वर्ल्ड कपच्या संघात त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग होते. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर युवराज सिंग खेळत होता. रोहित शर्मा फॉर्ममध्ये नसल्यानं वर्ल्ड कपच्या संघात संधी मिळाली नव्हती.


यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. एका मुलाखतीत रोहित म्हणाला की, वर्ल्ड कप हा शेवटचा पुरस्कार असतो आणि प्रत्येक खेळाडू या स्वप्नासाठीच धडपडत असतो. 2011 च्या वर्ल्ड कप संघात खेळता न आल्याचं शल्य राहिल असं त्यानं म्हटलं आहे.