

2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपला 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. अनेक खेळाडूंच स्वप्न असतं देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं. काही दिग्गजांचं हे स्वप्न पूर्ण होतं मात्र, काहींचं स्वप्न अधुरं राहतं. क्रिकेट जगतात आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या दिग्गजांना वर्ल्ड कपने हुलकावणी दिली.


दक्षिण आफ्रिकेच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या एबी डिव्हिलियर्सचे चाहते जगभर आहेत. डिव्हिलियर्सने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. 50 पेक्षा जास्त सरासरीने आणि 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. मात्र, त्याला कारकिर्दीत आफ्रिकेला वर्ल्ड कप जिंकून देता आला नाही.


भारतीय क्रिकेटमध्ये भक्कमपणे मैदानात उभा राहणारा माजी कर्णधार राहुल द्रविडलासुद्धा त्याच्या कारकिर्दीत वर्ल्ड कपचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. तर 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये द्रविडने 10 सामन्यात 318 धावा केल्या होत्या. त्यावेळी फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. तर 2007 मध्ये द्रविडच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारताचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं.


श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज कुमार संगकारा हा वर्ल्ड कपमधील सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक आहे. त्याने अनेक विक्रम नावावर केले आहेत. क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात सहज वावरलेल्या संगकाराला वर्ल्ड कप मात्र जिंकून देता आला नाही. दोन वेळा वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळलेल्या संगकाराचं हे स्वप्न अधुरं राहिलं.


न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक आणि कर्णधार ब्रॅडॉन मॅक्युलम तडाखेबाज फलंदाज म्हणून ओळखला जात होता. क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळताना त्याने न्यूझीलंडचे नेतृत्वही केलं. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने संघाला फायनलला पोहचवलं होतं. मात्र, त्याला विजेतेपदापासून दूर रहावं लागलं.


वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने कसोटीत 400 धावा करण्याचा विश्वविक्रम 2004 मध्ये केला होता. त्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 10 हजार धावाही काढल्या आहेत. पहिले दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला ब्रायन लाराच्या कारकिर्दीत मात्र एकही विजेतेपद पटकावता आलं नाही.