इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वच खेळाडू मेहनत घेत आहेत. संघाला विजेतेपद मिळवून द्यायचं यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांना वेगळीच चिंता लागून राहिली आहे. गोलंदाजांचा सामना हे दोन्ही खेळाडू सहज करतील पण इंग्लंडच्या चाहत्यानां सामोरं जाणं त्यांच्यासाठी कठीण आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाला असं वाटत आहे की, इंग्लंडचे प्रेक्षक, चाहते डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथला टार्गेट करतील. हे दोघेही गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोषी आढळले होते. त्यानंतर दोघांवरही एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. यावरुन दोघांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता ऑस्ट्रेलियन संघाला वाटते.