भारताचा डावखुरा फास्ट बॉलर टी नटराजन याच्यावर काहीच दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आयपीएलच्या 14व्या मोसमात नटराजन फक्त 2 सामनेच खेळू शकला होता. नटराजनने भारताकडून 1टेस्ट, 2 वनडे आणि 4 टी-20 खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये नटराजन खेळला होता, या सामन्यात भारताचा 3 विकेटने रोमांचक विजय झाला होता. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये नटराजनने 3 विकेट घेतल्या होत्या.
चायनामन बॉलर कुलदीप यादव यालाही टीम इंडियामध्ये स्थान मिळालं नाही. गेल्या काही काळापासून कुलदीप खराब फॉर्ममध्ये आहे. कुलदीप यादवने इंग्लंडविरुद्ध चेन्नईत शेवटची टेस्ट खेळली. या मॅचमध्ये कुलदीपला 2 विकेटच घेता आल्या. यानंतर त्याला आयपीएलमध्येही संधी मिळाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही कुलदीपला 2 मॅचमध्ये खेळवण्यात आलं, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.
टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेटमध्ये बॉलिंग करण्यासाठी अजून फिट नाही. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही त्याला फक्त एकाच सामन्यात बॉलिंग देण्यात आली होती, पण त्याला यामध्ये यश आलं नाही. पुण्यात झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये हार्दिकने 64 रनची खेळी केली आणि बॉलिंगही केली. हार्दिक पांड्या शेवटची टेस्ट 2018 साली इंग्लंडमध्येच साऊथम्पटनमध्ये खेळला होता. हार्दिकने भारतासाठी 11 टेस्ट, 60 वनडे आणि 48 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. आयपीएलच्या स्थगित झालेल्या मोसमातही हार्दिकने एकदाही बॉलिंग केलेली नाही.