युसूफ पठाणचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. गरिबी अशी होती की युसूफच्या घरी शौचालयही बांधायला पैसे नव्हते. परंतु, या गरीबीमुळे युसूफ आणि त्याचा धाकटा भाऊ इरफान याच्या प्रतिभेला कोणताच अडसर निर्माण झाला नाही. युसूफ पठाण हा भाऊ इरफानबरोबर मशिदीच्या अंगणात क्रिकेट खेळायचा. पुढे हे दोन्ही भाऊ टीम इंडियासाठी खेळले.
युसूफ पठाण हा भारतीय क्रिकेटमधील सर्वांत हार्ड हिटर फलंदाज मानला जातो. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच सिझनमध्ये युसूफ पठाणने अवघ्या 37 चेंडूंत मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक ठोकलं होतं. ख्रिस गेलने 2013 मध्ये यूसुफचा रेकॉर्ड केवळ 30 चेंडूंमध्ये शतक मारून तोडला. तरी युसूफ अजूनही आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेमधील फास्टेस्ट सेंच्युरी करणारा भारतीय आहे.
युसूफ पठाणचा टी-20 डेब्यू तर अप्रतिम होता. 2007 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी वीरेंद्र सेहवागला दुखापत झाली होती आणि महेंद्रसिंग धोनीने युसूफ पठाणला संधी दिली. ओपनिंगवेळी धोनीने युसूफ पठाणला मैदानात उतरवलं आणि या खेळाडूने अवघ्या 8 चेंडूंत 15 धावा फटकावून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली होती.