

ICC Cricket world cup मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंड संकटात सापडले आहे. ऑस्ट्रेलियाने सेमिफायनलला स्थान पक्कं केलं आहे. लंकेनं इंग्लंडला पराभूत करून सेमीफायनलच्या शर्यतीत आपणही असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता चौथ्या क्रमांकासाठी तीन संघ दावेदार आहेत.


न्यूझीलंड आणि भारत हे दोन्ही संघ स्पर्धेत अपराजित आहेत. या दोन्ही संघांना सेमिफायनलला पोहचण्यासाठी जास्त त्रास होणार नाही. तरीही चौथ्या स्थानावर राहणाऱ्या संघाला पाचव्या स्थानावरील संघाकडून धोका आहे. यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेचा समावेश आहे.


न्यूझीलंडने आतापर्यंत 6 सामन्यात 5 विजयासह 11 गुण मिळवले आहेत. एका सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यांचे उर्वरित सामने पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशी होणार आहे. यातील एका सामन्यात जरी विजय मिळवला तरी त्यांचा सेमिफायनल प्रवेश नक्की होईल. तीनही सामने गमावले तर त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागेल.


गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये फक्त एक सामना गमावला आहे. त्यांचे उर्वरित सामने न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहेत. त्यांचे सेमीफायनलमधील स्थान जवळपास नक्की झालं आहे. मात्र, उर्वरित दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आणि लंकेनं तीनही सामने जिंकले तर रनरेटच्या जोरावर पुढची वाटचाल ठरणार आहे.


वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी 5 सामने झालेल्या भारताने चार सामने जिंकले असून एक सामना पावसाने रद्द झाला. भारताचे 9 गुण झाले असून उर्वरित सामने वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेशी होणार आहेत. यापैकी इंग्लंड वगळता इतर संघाविरोधात भारत सहज विजय मिळवू शकतो. त्यामुळे भारत सहज सेमिफायनल गाठेल.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभाने इंग्लंडची सेमिफायनलची वाट बिकट झाली आहे. 7 सामन्यात तीन पराभव आणि 4 विजयांसह त्यांचे 8 गुण झाले आहेत. ते चौथ्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडचे उर्वरित 2 सामने भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत. या संघांविरुद्ध गेल्या 27 वर्षांत त्यांना वर्ल्ड कपमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. सेमीफायनलला पोहचण्यासाठी त्यांना किमान 11 गुण मिळवावे लागतील.


लंकेन इंग्लंडला पराभूत करून 6 गुण मिळवत आपणही शर्यतीत असल्याचा इशारा दिला. त्यांचे उर्वरित सामने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारताशी आहेत. सेमीफायनल गाठायची असले तर तीनही सामन्यात त्यांना विजय आवश्यक आहे.


पाकिस्तानची वर्ल्ड़ कपमधील कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. आता त्यांची गाठ न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशशी पडणार आहे. यात त्यांना विजय मिळववा लागेल तरच ते सेमिफायनलला पोहचू शकतात. त्यातही त्यांना इंग्लंड, श्रीलंकेच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.


वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र या संघांची उर्वरित सामन्यातील कामगिरी स्पर्धेतील इतर संघांच्या वाटचालीवर परिणाम करू शकते.