

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात विजय मिळवून इंग्लंड पहिल्यांदा विश्वविजेता झाला. तर न्यूझीलंडचे सलग दुसऱ्यांदा स्वप्न भंगले. 2015 मध्येही त्यांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.


न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचे संघाच्या एकूण धावांमध्ये तब्बल 30 टक्क्यांपर्यत योगदान आहे. त्याने स्पर्धेत 578 धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याला फक्त 30 धावा करता आल्या. त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानं रोहित शर्मा, मिशेल स्टार्क, शाकिब अल हसन यांना मागे टाकलं.


भारताचा हिटमॅन रोहित शर्माने 9 सामन्यात 5 शतके आणि एका अर्धशतकासह 648 धावा केल्या. एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्यानं केला. तसेच 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा रोहित शर्मानेच केल्या आहेत. मात्र भारताचे आव्हान सेमीफायनलमध्ये संपुष्टात आले.


क्रिकेटमध्ये फलंदाजांची कामगिरी दिसत असली तरी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने सर्वाधिक 27 विकेट घेतल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आहे. त्यानं 8 सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत.