Bye Bye 2020 : दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी यावर्षी घेतली निवृत्ती
कोरोना व्हायरसमुळे 2020 हे वर्ष क्रीडा जगतासाठी निराशाजनक राहिलं. कोविड-19 मुळे क्रिकेटच्या अनेक स्पर्धा रद्द झाल्या. 2020 या वर्षात पाच दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी निवृत्तीही घेतली.


कोरोना व्हायरसमुळे 2020 हे वर्ष क्रीडा जगतासाठी निराशाजनक राहिलं. कोविड-19 मुळे क्रिकेटच्या अनेक स्पर्धा रद्द झाल्या. चाहत्यांप्रमाणे खेळाडूंनाही बराच काळ घरात बसूनच घालवावा लागला. अनेक महिने घरात घालवल्यानंतर जुलै महिन्यात क्रिकेटला सुरुवात झाली. यानंतर आयपीएलही खेळवली गेली. 2020 या वर्षात पाच दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी निवृत्तीही घेतली.


एमएस धोनी : भारताला दोन वर्ल्ड कप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या एमएस धोनी (MS Dhoni) याने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 16 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये धोनीने 350 वनडेमध्ये 10,733 रन 50.58 च्या सरासरीने केले. धोनीने 90 टेस्टमध्ये 38.09 च्या सरासरीने 4,876 रन आणि 98 टी-20 मध्ये 37.60 च्या सरासरीने 1,617 रन केले. आंततराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी धोनी आयपीएलमध्ये खेळला. 2019 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध धोनी शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला.


सुरेश रैना : धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच 33 वर्षांच्या सुरेश रैना (Suresh Raina) यानेही निवृत्तीची घोषणा करून सगळ्यांना धक्का दिला. बऱ्याच कालावधीपासून रैना टीम इंडियाच्या बाहेर आहे. 17 जुलै 2018 साली इंग्लंडविरुद्ध रैना शेवटची वनडे खेळला होता. रैनाने 18 टेस्टमध्ये 26.48 च्या सरासरीने 768 रन केले, यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. रैनाने 226 वनडेमध्ये 35.31 च्या सरासरीने 5,615 रन केले. वनडेमध्ये रैनाच्या नावावर 5 शतकं आणि 36 अर्धशतकं आहेत. 78 टी-20 मॅचमध्ये रैनाने 29.16 च्या सरासरीने 1,605 रन केले, यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेस होता.


पार्थिव पटेल : 9 डिसेंबरला विकेट कीपर पार्थिव पटेल (Parthiv Patel) यानेही क्रिकेटच्या सगळ्या प्रकारातून संन्यास घेतला. पटेलने 17 वर्ष आणि 153 दिवसाचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 35 वर्षांच्या पार्थिवने 25 टेस्ट, 38 वनडे आणि दोन टी-20 मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. पटेलने टेस्ट क्रिकेटमध्ये 31.13 च्या सरासरीने 934 रन केले. तर वनडेमध्ये त्याने 23.7 च्या सरासीरने 736 रन बनवले. पटेलने विकेट कीपर म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये 62 कॅच पकडले, तर 10 स्टम्पिंग केले. 2004 साली दिनेश कार्तिक आणि एमएस धोनीच्या आगमनामुळे पटेलला जास्त संधी मिळाली नाही.


मोहम्मद आमिर : पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर याने अचानक निवृत्ती घेऊन धक्का दिला. 28 वर्षांच्या या फास्ट बॉलरने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि टीमवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला. आमिरने 30 टेस्ट, 61 वनडे आणि 50 टी-20 मॅच खेळल्या. यामध्ये त्याने टेस्टमध्ये 119, वनडे मध्ये 81 आणि टी-20 मध्ये 59 विकेट घेतल्या.