

गेल्या अनेक दशकांपासून क्रिकेट जगतात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी आपली ओळख निर्माण केली आहे. यात आता आणखी एका गोलंदाजाची भर पडली आहे. त्याला पाकिस्तानच्या क्रिकेटचं भविष्य असंही म्हटलं जात आहे.


उंच शरिरयष्टीच्या मोहम्मद हसनैनने पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्यात तीन विकेट घेऊन सर्वांची वाहवा मिळवली.


क्वेटा ग्लॅडिएटर्सला पीएसएलचे विजेतेपद पटकावण्यात हसनैनने महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याच्या गोलंदाजीचा वेग आणि त्यावर असलेल्या नियंत्रणाचे कौतुक केले जात आहे.


काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॅटसनने हसनैनचं कौतुक केलं होतं. कोणत्याही फलंदाजाला त्याच्यासमोर उभा राहणं हे आव्हान असल्याचं शेन वॅटसनने म्हटलं होतं.


पाकिस्तानातील हैदराबादचा असलेला हसनैन सध्या पाकिस्तानचा सर्वात वेगवान गोलंदाज असल्याचे म्हटले जात आहे.


2016च्या अंडर 19 आशिया चषकात त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. गेल्या हंगामात त्याने पाकिस्तान टेलीव्हिजनकडून 2 प्रथमश्रेणी सामने खेळले होते.