मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म होण्यापासून ते भारतीय क्रिकेट टीममध्ये आपल्या गोलंदाजीचा वेगळा ठसा उमटवण्यापर्यंत मोहम्मद सिराजचा जीवन प्रवास प्रेरणादायक आहे. मोहम्मद सिराज यांच्या कुटुंबाला त्याच्या मुलाने अभियंता व्हावे असे वाटत होते, परंतु सिराजचे लक्ष फक्त खेळावर होते. पैशाची कमतरता, साधनांची कमतरता असतानाही मोहम्मद सिराजने आज स्वतःला क्रिकेटच्या अशा टप्प्यावर नेले आहे, जिथे आज संपूर्ण जग त्याला ओळखते.
'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या शोमध्ये मोहम्मद सिराजने आपले जुने दिवस आठवले. सिराजने खुलासा केला की, “माझे वडील ऑटो रिक्षा चालवायचे. माझ्या भावाला पॉकेटमनी म्हणून 100 रुपये मिळायचे कारण तो इंजिनीअरिंग शिकत होता आणि कॉलेजला गेला होता. पप्पा मला रोज ७० रुपये द्यायचे. 40 बाईकसाठी पेट्रोल भरायला जायचे." सिराजने पुढे उघड केले की त्याच्या बाईकला सुरू करण्यासाठी धक्का मारावा लागत होता. तो म्हणाला, मी जेव्हा सरावासाठी जायचो तेव्हा आलिशान गाड्यांमधून लोक तिथे यायचे.
मोहम्मद सिराजने खुलासा केला, “आम्ही खेड्यात टेनिस बॉलने खेळायचो. मी वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत चप्पल घालून खेळायचो. माझ्याकडे शूज नव्हते. कारण शूज खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते आणि आमच्याकडे तेव्हा ते नव्हते. त्यानंतर सिराजने एक आठवण सांगितली की, "जेव्हा मला एका स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले गेले होते जेथे मला स्पाइक्स देण्यात आले होते, जे मी प्रथमच घातले होते!"
सिराजने सांगितले की 2016 मध्ये रणजी ट्रॉफी खेळण्यापूर्वी मी हैदराबादमध्ये अनेक लीग खेळलो तेव्हा मी पहिल्यांदा क्रिकेट खेळून 500 रुपये कमावले होते. तेव्हा माझ्या आईचा माझ्या खेळावर विश्वास बसला. तो म्हणाला, "आई म्हणायची की मोठा भाऊ इंजिनियर आहे, कुठे फिरतोयस. कॉलेजमधून बंक करून खेळायला जायचो. तिथून फोन यायचा. यानंतर माझे वडील घरी आल्यानंतरच मी घरी जायचो, कारण फक्त माझे वडीलच मला आईच्या ओरड्यापासून वाचवू शकायचे.
टेनिस-बॉल क्रिकेटमधील त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याचा हैदराबाद संघात समावेश झाला तेव्हा मोहम्मद सिराजच्या प्रवासाला कलाटणी मिळाली. तथापि, 23 वर्षांखालील एका महत्त्वाच्या खेळादरम्यान त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाल्यामुळे त्रास वाढला. तो म्हणाला, “माझे नाव 23 वर्षांखालील संघात समाविष्ट होते, पण डेंग्यूमुळे मला रुग्णालयात दाखल करावे लागले. माझ्या प्रशिक्षकाने मला सांगितले की, मी सरावाला उपस्थित न राहिल्यास मला संघातून काढून टाकतील.
सिराजने मुलाखतीत सांगितले की, "जेव्हा मी पुन्हा रुग्णालयात टेस्टसाठी गेलो तेव्हा रिपोर्टमधून कळले की मला डेंग्यू नव्हताच. मला अजूनही असे वाटते आहे की तो एक चमत्कारच होता, कदाचित हे सर्व माझ्या पालकांच्या प्रार्थनेमुळेच घडले." मोहम्मद सिराजने 2021 च्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यात आल्यावर त्याला अश्रू अनावर झाले होते. हा भावनिक क्षण मोहम्मद सिराजसाठी खूप महत्त्वाचा होता, कारण यादिवशी त्याने दिवंगत वडिलांच्या स्वप्नांची पूर्ती केली होती.