दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर टीम इंडियात नवं वादळ उभं ठाकलं आहे. आपल्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, ही गोष्ट आपल्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीची टेस्ट टीम निवडण्याच्या दीड तास आधी सांगण्यात आली, असं विराट म्हणाला. सोबतच त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केलेला दावाही खोडून काढला. आपण विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगितलं होतं, पण विराटने याला नकार दिल्याचं गांगुली म्हणाला. विराटने मात्र आपल्याला असं काहीही सांगण्यात आलं नसल्याची प्रतिक्रिया दिली. विराटच्या या वक्तव्यानंतर त्याच्यात आणि गांगुलीमध्ये वाद सुरू झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.
गांगुली-चॅपल वाद : 2005 साली ऑस्ट्रेलियाचे ग्रेग चॅपल टीम इंडियाचे कोच झाले, यानंतर लगेचच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधलं वातावरण खराब झालं. चॅपल आणि तेव्हाचा कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly vs Greg Chappell) यांच्यात वाद झाल्यामुळे गांगुलीला कॅप्टन्सीचा राजीनामा द्यायला लागला होता, यानंतर त्याला टीमबाहेरही जावं लागलं. राहुल द्रविडला टीम इंडियाचं कर्णधार करण्यात आलं, यानंतर गांगुलीने टीम इंडियात पुनरागमन केलं. 2007 वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पहिल्याच राऊंडला बाहेर झाली, यानंतर चॅपल यांची हकालपट्टी करण्यात आली. भारताचे अनेक माजी क्रिकेटपटू तो काळ टीम इंडियाचा सगळ्यात खराब असल्याचं सांगतात.
कोहली-कुंबळे वाद : 2016 साली अनिल कुंबळे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला, पण एकाच वर्षात त्याला या पदाचा राजीनामा द्यावा लागला. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर अनिल कुंबळेने आपलं पद सोडलं. कॅप्टन विराट कोहलीसोबत (Virat Kohli vs Anil Kumble) पटत नसल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं अनिल कुंबळेने स्पष्ट केलं. विराटसह टीम इंडियातले अन्य खेळाडू अनिल कुंबळेच्या कामाच्या पद्धतीबाबत समाधानी नसल्याचं वृत्तही समोर आलं होतं.
धोनी-सेहवागचे संबंध : एमएस धोनी आणि सेहवाग (MS Dhoni vs Virender Sehwag) यांच्यातल्या संबंधांबाबतही माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली होती. धोनीला टीममध्ये फिट फिल्डर पाहिजे होते आणि सेहवाग टीममधला सगळ्यात फिट खेळाडू नव्हता. मागच्याच वर्षी सेहवागने या वादावर प्रतिक्रिया दिली होती. भारताचे सुरुवातीचे तीन बॅटर स्लो फिल्डर आहेत, असं धोनी ऑस्ट्रेलियात म्हणाला होता. त्याने पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य केलं होतं, पण टीम मीटिंगमध्ये तो याबाबत काहीच बोलला नसल्याचं सेहवागने सांगितलं होतं.
युवराज-धोनी : एमएस धोनीने आपल्या मुलाचं करियर खराब केल्याचा आरोप युवराज सिंगचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी केला होता. युवराज टीम इंडियाचा कर्णधार होणार होता, पण धोनीकडे ती जबाबदारी गेली, त्याला बनवलेली टीम मिळाली, असं योगराज सिंग म्हणाले होते. युवराज आणि धोनी या दोघांपैकी कोणीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसंच वैयक्तिक आयुष्यातही हे दोघं चांगले मित्र आहेत.
विराट-रोहित : विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli vs Rohit Sharma) यांच्यामध्येही वाद असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. एवढंच नाही तर रोहितने सोशल मीडियावरून विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना अनफॉलो केल्यामुळेही या चर्चांना उत आला. विराटने मात्र आपला रोहितसोबत कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं. या गोष्टी आता वारंवार सांगून मीही वैतागलो असल्याचं विराट पत्रकार परिषदेत म्हणाला.