

अफगाणिस्तानने राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर आयर्लंडविरुद्धची कसोटी जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. एका कसोटीच्या मालिकेत आयर्लंडवर 7 गडी राखून आपला पहिला वहिला विजय साजरा केला.


आतापर्यंत अफगाणिस्तानचा हा दुसराच कसोटी सामना होता. दुसऱ्या कसोटीत विजय मिळवणारा अफगाणिस्तान हा तिसरा संघ ठरला आहे.


अफगाणिस्तानने पहिली कसोटी भारताविरुद्ध खेळली होती. भारताने त्यांना 262 धावांनी पराभूत केले होते.


पहिल्या कसोटीत विजय मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे. तर सर्वात उशिरा न्यूझीलंडने 45 व्या कसोटीत पहिला विजय मिळवला होता. तर भारताला 25 कसोटीपर्यंत वाट बघावी लागली होती.


आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 172 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणिस्तानने पहिल्या डावात 314 धावा केल्या. दुसऱ्या डावात आयर्लंडने 288 धावा करून अफगाणिस्तानसमोर 147 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान अफगाणिस्तानने कसोटीच्या चौथ्या दिवशी पूर्ण करत एक दिवस आधीच विजय मिळवला.