कोरोना व्हायरसमुळे 2020 या वर्षात कमी क्रिकेट खेळलं गेलं. मागच्या वर्षीच्या दुसऱ्या भागात इंग्लंडमधून क्रिकेटला पुन्हा सुरूवात झाली. पण यासाठी खेळाडूंना बायो-बबलमध्ये ठेवण्यात आलं. यानंतर झालेल्या प्रत्येक क्रिकेट स्पर्धेत खेळाडू बायो-बबलमध्ये होते. बायो-बबल म्हणजे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टीमचे खेळाडू, सहकारी आणि आयसीसीचे अंपायर आणि इतर संबंधित अधिकारी यांना जगाच्या संपर्कात येता येत नाही. बायो-बबलच्या या कठीण काळामध्ये खेळाडूंनी पाच वेळा नियम मोडल्याचं समोर आलं.
जोफ्रा आर्चर पहिलाच खेळाडू : इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर बायो-बबलचं उल्लंघन करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. याबद्दल आर्चरला दंड आणि शिक्षाही करण्यात आली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी आर्चर त्याच्या घरी ब्राईटॉनला गेला होता. यानंतर आर्चरकडून दंड वसूल करण्यात आला, तसंच त्याला सीरिजच्या पुढच्या सामन्यातून काढून टाकण्यात आलं.
पाकिस्तानच्या टीमने मोडला नियम : न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तानने तब्बल 53 जणांची टीम पाठवली होती. इस्लामाबादमध्ये कोरोना टेस्ट केल्यानंतर सगळे जण निगेटिव्ह आले होते, पण न्यूझीलंडमध्ये पोहोचताच पाकिस्तानच्या 6 खेळाडूंना कोरोना झाल्याचं समोर आलं. पाकिस्तानची टीम न्यूझीलंडमध्ये राहत असलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही दृष्य समोर आली. तेव्हा पाकिस्तानी टीमचे खेळाडू एकमेकांसोबत जेवण करत होते आणि गप्पा मारत होते. यानंतर न्यूझीलंड सरकारने पाकिस्तानला घरी पाठवण्याचीही धमकी दिली होती.
दक्षिण आफ्रिका-इंग्लंड सीरिज रद्द : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातली टी-20 सीरिज झाल्यानंतर मग वनडे सीरिज कोरोनामुळे रद्द करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोना झाल्यामुळे वनडे सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका खेळाडूनंतर आफ्रिकेच्या आणखी काही खेळाडूंना कोरोना झाल्याचं समोर आलं. खेळाडूंनी बायो-बबलचं उल्लंघन केल्यामुळे कोरोना झाल्याचंही सांगण्यात आलं.
क्रिस लीनमुळे टीम धोक्यात : ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट्सकडून खेळणारा क्रिस लीनही वादात सापडला. बायो-बबलचं उल्लंघन केल्यामुळे लीनला मोठा दंड भरावा लागला. क्रिस लीनने चाहत्यासोबत सेल्फी काढला, तसंच त्याने टॅक्सीनेही प्रवास केला. यानंतर क्रिस लीनला वेगळं ठेवण्यात आलं. टी-20 क्रिकेटमध्ये खेळाडू डग आऊटमध्ये बसतात, पण लीनला पॅव्हेलियनमध्ये बसवण्यात आलं. पण क्रिस लीन याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली.
रोहित आणि इतर खेळाडू आयसोलेट : मेलबर्नमध्ये असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनीही बायो-बबलचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि पृथ्वी शॉ हे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यामुळे त्यांना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. बीसीसीआयने मात्र खेळाडूंनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं सांगितलं आहे.