

आयपीएलच्या 12 व्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. क्रिकेटमध्ये दररोज अनेक विक्रम होतात आणि जुने मोडतात. आयपीएलमध्ये ख्रिस गेलच्या नावावर असलेला विक्रम मात्र अद्याप कोणत्याही खेळाडूला मोडता आलेला नाही. यावेळी कोणी गेलचा हा विक्रम मोडणार का?


वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला आयपीएलमधील सिक्सर किंग मानलं जातं. त्याने 23 एप्रिल 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध नाबाद 175 धावांची वादळी खेळी केली होती. यात तब्बल 17 षटकार त्याने लगावले होते. हा विक्रम अद्याप कोणताही फलंदाज मोडू शकला नाही.


आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ब्रॅडॉन मॅक्युलम आहे. त्याने कोलकत्ता नाइट रायडर्सकडून खेळताना 18 एप्रिल 2008 ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 158 धावा केल्या होत्या. यात त्याने 13 षटकार मारले होते.


तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा ख्रिस गेल आहे. त्याने 17 मे 2012 मध्ये 128 धावांच्या खेळीत 13 षटकार मारले होते.


सर्वाधिक षटकार मारण्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या एबी डिव्हिलियर्स चौथ्या स्थानी आहे. त्याने 14 मे 2016 ला गुजरात लायन्स विरुद्ध खेळताना 129 धावा केल्या होत्या. यात त्याने 12 षटकार मारले होते.