

आयपीएलच्या 12व्या हंगामात सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत त्या चेन्नईच्या संघावर. मागच्या वर्षी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने दोन वर्षांच्या बंदीनंतर कमबॅक केला आणि चौथ्यांदा आयपीएलचे किंग्ज झाले. त्यामुळे यंदा चेन्नईचा संघ कोणत्याही दबावाखाली असणार नाही.


चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ आहे. 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएल जिंकणारा हा संघ, 2008, 2012, 2013 आणि 2015 मध्ये उपविजेता संघ होता. तर, 2009 आणि 2014 मध्ये चेन्नईचा संघ सेमीफायनलिस्ट होता. 2008 ते 2018 या दहा वर्षात या संघाने एकूण 148 सामने खेळले आहेत. ज्यातील 90 सामने जिंकले आहेत तर, केवळ 56 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात धोनीची सेना कशी कामगिरी करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


चेन्नई संघाचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंग आहे. तर, एम.ए. चिंदबरम हे चेन्नई संघाचं होम ग्राऊंड आहे. महेंद्रसिंह धोनी, ड्वेन ब्रावो, सुरेश रैना, हरभजन सिंह, फाफ डू प्लेसी हे या संघाचे स्टार खेळाडू आहेत.


चेन्नई संघाने मागील हंगामातील बरेच खेळाडू राखीव ठेवले होते. त्यामुळे 2019च्या लिलावात त्यांनी कमी नवीन खेळाडूंचा भरणा केला. यावर्षी चेन्नई संघाने मोहित शर्मा या खेळाडूला पाच कोटी रुपये किमतीवर विकत घेतले. तर, पुणेकर ऋतुराज गायकवाड हा खेळाडू यावर्षी चेन्नईसाठी नवीन चेहरा असणार आहे.


दोन वर्षांच्या बॅननंतर कमबॅक केलेल्या या संघाने, मागच्या वर्षी चौथ्यांदा चॅम्पियन ठरत आपल्यावरील बॅनचा टॅग खोडून काढला. चेन्नईकडे फाफ डू प्लेसी, धोनी, सुरेश रैना, मुरली विजय, केदार जाधव आणि अंबाती रायडू यांसारखे स्टार प्लेअर आहेत. तर, शेन वॉटसन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो यांसारखे ऑलराऊंडर खेळाडू आहे. जलद गोलंदाजीमध्ये शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, लुंगी एन्गिडी आणि मोहित शर्मा आहेत. तर, हरभजन सिंह, इमरान ताहिर आणि कर्ण शर्मा हे आघाडीचे फिरकी गोलंदाज आहेत.