मनोज तिवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधला यशस्वी खेळाडू आहे. तिवारीने मागच्याच आठवड्यात रणजी ट्रॉफी 2022 च्या क्वार्टर फायनलच्या दोन्ही इनिंगमध्ये 74 आणि 136 रनची खेळी केली होती. मनोज तिवारी सध्या बंगालच्या शिबपूरचा आमदार आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या काही महिने आधी त्याने टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याला मोठी जबाबदारी देत क्रीडा मंत्री केलं.
मंत्री झाल्यानंतरही मनोज तिवारीचं क्रिकेटबद्दलचं प्रेम कमी झालं नाही. मध्य प्रदेशविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं 29वं शतक ठोकलं. शतक केल्यानंतर त्याने पत्नी आणि कुटुंबाला धन्यवाद देणारं एक पत्र झळकावलं. या पत्रामध्ये मनोज तिवारीची पत्नी आणि कुटुंबातल्या सदस्यांची नावं होती आणि बदामाचं चित्र होतं. तिवारीने 129 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने 9200 रन केल्या आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये तो बंगालचा कर्णधारही होता.
मनोज तिवारीचा जन्म बंगालच्या हावडामध्ये झाला. फूटबॉलचा गड असलेल्या बंगालमध्ये सौरव गांगुलीनंतर मनोज तिवारीने क्रिकेटमधून बरीच लोकप्रियता मिळवली. मनोज तिवारीने भारताकडून 12 वनडे आणि 2 टी-20 मॅच खेलल्या. वनडेमध्ये त्याने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 287 रन केले. तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याला फक्त 15 रनच करता आल्या.