ऍशेस सीरिजचे (Ashes Series) सामने सध्या सुरू आहेत. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टेस्टवर (Australia vs Englnad) आपली पकड मजबूत केली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडची टीम पहिल्या इनिंगमध्ये 236 रनवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 473 रन केले होते, त्यामुळे कांगारूंना पहिल्या इनिंगमध्ये 237 रनची आघाडी मिळाली.
इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने यावर्षी म्हणजेच 2021 साली टेस्ट क्रिकेटमध्ये 1600 पेक्षा जास्त रन केल्या आहेत. एका वर्षात 1600 पेक्षा जास्त रन करणारा तो जगातला चौथा खेळाडू आहे. याआधी पाकिस्तानचा मोहम्मद युसूफ, वेस्ट इंडिजचा व्हिव्हियन रिचर्ड्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथने हा विक्रम केला आहे.
इंग्लंडची टीम यावर्षातली 14 वी टेस्ट खेळत आहे. यातल्या 4 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर 7 सामने त्यांनी गमावले. दुसऱ्या टेस्टमध्येही ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये आहे. इंग्लंडचा या टेस्टमध्ये पराभव झाला तर ते 140 वर्षातल्या सगळ्यात खराब कामगिरीचं बरोबरी करतील. टीम याआधी 4 वेळा एका वर्षात सर्वाधिक 8 टेस्ट हरली आहे.
इंग्लंडने पहिली टेस्ट 1877 साली खेळली होती, यानंतर टीम 1984, 1986, 1993 आणि 2016 साली एका वर्षात 8 टेस्ट हरली. ऍशेस सीरिजची तिसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्या टेस्टमध्येही जर इंग्लंडचा पराभव झाला, तर त्यांच्या नावावर या वर्षात सर्वाधिक 9 पराभवांची नोंद होईल. जो रूटच्या नावावर हा नकोसा विक्रम होईल.
याआधी टीम इंडियाने (Team India) इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 2-1 ची आघाडी घेतली आहे. कोरोनामुळे अखेरची टेस्ट मॅच होऊ शकली नाही. ही टेस्ट आता पुढच्या वर्षी होणार आहे. रूटशिवाय इंग्लंडचा इतर कोणताही खेळाडू बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे टीमची कामगिरीही खराब झाली आहे.