

आयपीएलनंतर 30 मे रोजी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यात जगातील 10 संघ सहभागी असतील. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचा संघही सहभागी होणार आहे. क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून या देशाने नेहमीच आश्चर्यकारक अशी कामगिरी केली आहे.


अफगाणिस्तानने असोसिएट देशांच्या यादीतून आय़सीसीचे पूर्ण सदस्यत्व मिळवले आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये ते पूर्ण सदस्य म्हणून सहभागी होतील.


अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील वाटचालीत भारताचे मोठे योगदान राहिले आहे. अफगाणिस्तानला मैदानाच्या कमतरतेमुळे सरावसुद्धा भारतात करावा लागतो. बीसीसीआयकडून त्यांना मदत केली जाते. त्यांचे देशांतर्गत सामने ग्रेटर नोएडा आणि डेहराडूनमध्ये खेळले जातात.


आता भारतातील सर्वात मोठी दुध उत्पादक कंपनी अमुलने वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचे प्रमुख प्रायोजकत्व घेतले आहे. वर्ल्ड कपवेळी अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या जर्सीवर आणि ट्रेनिंग किटवर अमुलचा लोगो दिसणार आहे. याबाबतची माहिती अमुलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.