PSL : 'नाश्त्याला सडकी अंडी आणि टोस्ट', पाकिस्तान बोर्डावर भडकला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) सहावा मोसम कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) स्थगित करण्यात आला आहे. त्याआधी ऍलेक्स हेल्स (Alex Hales) याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) सडकी अंडी नाश्त्याला दिल्याचा आरोप केला.


पाकिस्तान सुपर लीगमध्ये सुरू असलेले वाद काही कमी व्हायच नाव घेत नाहीयेत. इंग्लंडचा बॅट्समन आणि पीएसएलमध्ये इस्लामाबादकडून खेळणाऱ्या ऍलेक्स हेल्सने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पोलखोल केली आहे. नाश्त्याला आपल्याला सडलेली अंडी आणि टोस्ट देण्यात आल्याचा दावा हेल्सने केला आहे. याचा एक फोटोही त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला.


हेल्सने हा फोटो नंतर डिलीट केला असला, तरी चाहत्यांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रोल करण्यात येत आहे.


कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान सुपर लीगचा सहावा मोसम अर्ध्यातच स्थगित करण्यात आला आहे. 6 खेळाडूंसह 7 जणांना कोरोना झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या हॉटेलबाबत निष्काळजीपणा केल्याचा आरोप होत आहे. हॉटेलमध्ये बायो बबलचं पालन करण्यात आलं नाही, त्यामुळे हे झालं, असं वृत्त आहे.


टीम मालकांसोबत बैठक घेऊन सगळ्यांच्या आरोग्याचा विचार करत, हा निर्णय घेण्यात आल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.