दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने नोव्हेंबरमध्ये निवृत्तीची घोषणा केली. मिस्टर 360 डिग्री म्हणजेच डिव्हिलियर्सने आपल्या झटपट फलंदाजीने नेहमीच चाहत्यांची मने जिंकली. 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर एबी डिव्हिलियर्सने 114 कसोटी, 228 एकदिवसीय आणि 78 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. सर्व फॉरमॅटमध्ये त्याने कसोटी आणि एकदिवसीय दोन्हीमध्ये 50 च्या सरासरीने 20014 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटने 47 शतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये डिव्हिलियर्स हा सर्वात जलद 50, 100 आणि 150 धावा करणारा खेळाडू आहे.
टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या पराभवानंतर संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आतापर्यंत सर्व 7 टी-20 चषक खेळलेल्या ब्राव्होने 2012 आणि 2016 मध्ये आपल्या संघाला चॅम्पियन बनवले होते. ब्राव्होने 2004 मध्ये पदार्पण केले होते तेव्हा पासून तो सतत क्रिकेट खेळत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 हजारांहून अधिक धावा आहेत. तसेच त्याने वनडेत 199 आणि कसोटीत 86 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 78 विकेट घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 699 विकेट घेतल्या आहेत. त्याने कसोटीत 435, एकदिवसीय सामन्यात 196 आणि T20 मध्ये 64 बळी घेतले. डेल स्टेन 2343 दिवस नंबर 1 कसोटी बॉलर राहिलेला आहे. हा एक विश्वविक्रम आहे.
श्रीलंकेचा अनुभवी सलामीवीर उपुल थरंगाने 23 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने थोड्या काळासाठी श्रीलंकेच्या संघाची कमानही सांभाळली होती. 36 वर्षीय उपुल थरंगा जुलै ते नोव्हेंबर 2017 मध्ये कर्णधार होता. 2019 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो श्रीलंकेकडून शेवटचा खेळला होता.