

उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यातील इतर भागात यंदा चांगला पाऊस कोसळत आहे. पुणे जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे.


पुरंदर तालुक्यातील जेजुरी जवळचे नाझरे धरण रात्री तुडुंब भरून वाहू लागले आहे. गेल्या वर्षी देखील हे धरण पूर्ण भरून वाहिले होते.


सुमारे 788 दशलक्ष घनफुट क्षमतेचे हे धरण असून या धरणावर जेजुरी, जेजुरी औद्योगिक क्षेत्र त्याच बरोबर पुरंदर व बारामती तालुक्यातील 50 गावांचा पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा प्रश्न मार्गी लावणारे आहे. त्याचबरोबर दोन्ही तालुक्यातील लाभक्षेत्रातील एकूण 3500 हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.


पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यात संततधार पर्जन्यवृष्टी राहिल्याने कऱ्हा नदी वाहू लागली होती. साधारणपणे दोन हजार क्यूसेक वेगाने नदी पात्रातून पाणी जलाशयात येत राहिल्याने रात्री 10 वाजता जलाशय भरून वाहू लागले.