सावधान! पुण्यात 20 हजारापर्यंत वाढू शकतात कोरोना रुग्ण; Covid च्या दुसऱ्या लाटेसाठी कशी आहे सज्जता?
पुण्यात गेले 21 दिवस कोरोनाचा आलेख उतरत गेला होता. तो बुधवारी अचानक पुन्हा चढला. Coronavirus ची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पुणेकरांनी काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिकेने (PMC) केलं आहे. प्रशासनाची कशी आहे सज्जता? पाहा..


महाराष्ट्रातच नाही तर देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात रुग्णवाढीचा कमी झालेला आलेख बुधवारपासून पुन्हा चढला आहे. ही Covid च्या नव्या लाटेची नांदी असू शकते. त्यामुळे पुणेकरांनी सावध राहावं, असा इशारा महापालिकेनं दिला आहे.


पुण्यात बुधवारी (18 नोव्हेंबर) दिवसभरात 384 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या 21 दिवसांतील ही सर्वाधिक वाढ आहे.


29 ऑक्टोबरपासून पुण्यात Corona रुग्णांची दैनंदिन संख्या 380 पेक्षा कमी राहिली आहे. गेल्या काही दिवसात तर दीडशेच्या आत नव्या रुग्णांची नोंद होत होती. पण 18 नोव्हेंबरला पहिल्यांदाच कोरोनाची रुग्णांची संख्या एकदम वाढली.


दिवाळीपूर्वी पुण्याच्या बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाल्याने तुफान गर्दी करत पुणेकरांनी निष्काळजीपणा केला.


पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुण्यात दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत सज्ज असल्याचं सांगितलं.


अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या अंदाजानुसार शहरात अॅक्टिव्ह पेशंट्सचा आकडा पुन्हा वाढू शकतो. 20 सप्टेंबरला 17781 रुग्ण होते. हा आकडा 19500 किंवा 20 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.


पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीसुद्धा पुणेकरांना दक्षता घ्यायचं आवाहन केलं आहे. दिवाळीच्या गर्दीचा परिणाम कोरोना रुग्णसंख्येत दिसू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.


पुण्यात कमी झालेली कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. चाचण्या वाढल्या तर कोरोना रुग्णाचं तातडीने निदान करून त्यांना क्वारंटाइन करणं शक्य होईल.