त्या अनुषंगाने शऱद पवार आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथील भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड या गायींच्या गोठ्यामध्ये गायींचे संगोपन व व्यवस्थापन या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दुपारी खाजगी दौऱ्यावर मंचरला आले होते. मात्र यावेळी माध्यमांशी बोलण्याचे त्यांनी टाळले आणि ते पुण्याकडे रवाना झाले.
दरम्यान, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचा दूध आंदोलनावरून चांगलाच समाचार घेतला. 'भाजपवाले मागील पाच वर्षांपासून सत्तेत होते, मात्र दूध उत्पादक शेतकरी व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत भाजप सरकारने कुठल्याही उपाययोजना केल्या नसून आज भाजपने दूध दरवाढीविरोधात आंदोलन पुकारले आहे, हे भाजपाचे आंदोलन राजकीय आंदोलन आहे,' असा टोला त्यांनी लगावला.
'देशात व राज्यात कोरोना महामारीचं संकट आहे. या संकटातही राज्य सरकारने अतिरिक्त दूध खरेदीचा निर्णय घेतला आहे. यातून शेतकऱ्यांच्या दुधाचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या व शेतकऱ्यांना यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढील काळात दुधाचे दर व निर्यातीबाबत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात विचारविनिमय सुरू असून यावर योग्य तो निर्णय राज्य सरकार घेईल,' असा विश्वास वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.