पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासन आणि प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्याला अपेक्षित यश येत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली.
त्यासोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
रोज वेगवेगळ्या रूग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कोरोना चाचण्या होत नाहीत. मात्र त्यांचे एक्सरे घेतले असता कोरोना असल्याचं निदर्शनास आलं आहे. एकट्या ससूनमध्ये रोज असे दहा बारा रूग्ण दगावत आहेत. ज्याची नोंद कोरोनाच्या मृत्यूमध्ये घेतली जात नाही असा आरोपही महापौरांनी या बैठकीत केला आहे.