PHOTOS : राज्यपालांनी थेट शिवनेरीवरून महाराष्ट्रातील नेत्यांना दिला सल्ला
"शिवनेरीवर येण्याअगोदर अनेक जण मला पाऊस आहे, चिखल आहे असं सांगून घाबरवत होते. पण केवळ महाराजांविषयी श्रद्धेचे स्थान माझ्या मनात असल्याने मी येथे येऊ शकलो," असेही राज्यपाल कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


रायचंद शिंदे , 16 ऑगस्ट : 'छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते तर अवतारी पुरुष होते. त्यांच्या जन्मस्थळी भेट देण्याचे भाग्य मला मिळाले हा माझ्या पुण्याचा भाग आहे,' असं प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरी येथे केले.


शिवजन्मस्थळी नतमस्तक होण्यासाठी राज्यपाल आज सकाळी 11 वाजता किल्ले शिवनेरीवर पोहचले. गडाच्या पहिल्या पायरीपासून ते जन्मस्थळापर्यंत ते न थकता न दमता चालत गेले.


प्रारंभी किल्ले शिवनेरीची गडदेवता शिवाई देवीचे दर्शन घेऊन राज्यपालांनी आरती सुद्धा केली. यावेळी "शिवाजी महाराज यहा पैदल आये थे तो हम भी पैदल आये" असं म्हणत पायी येण्याचे महत्व विषद केले.


"शिवनेरीवर येण्याअगोदर अनेक जण मला पाऊस आहे, चिखल आहे असं सांगून घाबरवत होते. पण केवळ महाराजांविषयी श्रद्धेचे स्थान माझ्या मनात असल्याने मी येथे येऊ शकलो," असेही राज्यपाल कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


"अनेक लोक शिवाजी महाराजांचे आपण उत्तराधिकारी आहोत असं सांगतात मात्र असे सांगताना त्यांनी घाबरू नये, मात्र शिवाजी महाराजांचे नाव घेऊन नुसता दिखावा देखील करू नये" असं म्हणत शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना राज्यपालांनी अप्रत्यक्षपणे फटकारले. "शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते येथे आल्यानंतर त्यांच्या कर्तव्याची आठवण होते आज राम, कृष्ण,गुरुगोविंदसिंग, शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला आले पाहिजेत, तरच जग आपल्याकडे तिरक्या नजरेने पाहणार नाही" अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


आपण उतारवयात देखील किल्ले शिवनेरी पायी चढून आलो.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील शिवनेरीवर पायी चालत यावं असे तुम्हाला वाटते का? या News 18 लोकमतच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्यपाल म्हणाले की, " हा, ज्याच्या-त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी शिवाजी महाराजांप्रती असलेल्या श्रद्धेपोटी मी पायी आलो" असं त्यांनी सांगितलं.


राज्यपालांनी महाराजांवरील गडावरील विविध वास्तू,झाडे यांची माहिती घेतली. शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी त्यांनी पाळण्याची तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजाही केली. शिवकुंज येथील जिजाऊ आणि बाल शिवबांच्या प्रतिमेचे दर्शन घेताना राज्यपाल नतमस्तक झाले.