

भारतात Coronavirus च्या रुग्णांची संख्या दररोज नवा उच्चांक गाठते आहे आणि महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. राज्यातही आता मुंबईपेक्षा पुण्यात सर्वात जास्त रुग्ण आहेत.


17 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण 6,04,358 रुग्णांपैकी मुंबईत 129479 तर पुण्यात 132481 कोरोना रुग्ण आहेत. पुण्यातील एकूण रुग्णांपैकी 39424 सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजे या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


नोंद झालेल्या कोरोना रुग्णांव्यतिरिक्त पुणे शहरातील इतर लोकांचीही सिरो सर्वेअंतर्गत अँटिबॉडी टेस्ट करण्यात आली आणि त्या अहवालात दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे.


1 जुलैपर्यंत पुणे महापालिकेच्या प्रशासकीय क्षेत्रात कोरोनाची पुष्टी झालेल्या 5 प्रभागांमध्ये 20 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आलं.


एकूण 1,664 व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. या रक्तातील अँटिबॉडी तपासण्यात आल्या. त्यावेळी या प्रभागांमध्ये कोविड-19 संक्रमणाचा व्यापक प्रसार झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.


अहवालानुसार, स्वतंत्र शौचालयं असणाऱ्या घरांमध्ये 45.3%, सामायिक शौचालयांचा वापर करणाऱ्यांमध्ये 62.2%, बंगल्यामध्ये राहणाऱ्यांमध्ये 43.9%, चाळी किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्यांमध्ये अनुक्रमे 56% आणि 62%, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांमध्ये 33% प्रमाण आढळून आलं आहे.


स्त्रिया आणि पुरुषांमध्ये फारसा फरक आढळला नाही. स्त्रियांमध्ये 50.1 तर पुरुषांमध्ये 52.8 इतकं प्रमाण आहे. तर 65 वर्षांपर्यंतच्या विविध वयोगटातील व्यक्तींमध्येही अँटिबॉडीजचं असंच प्रमाण आहे. मात्र 65 पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये तुलनेने कमी म्हणजे 39.8% प्रसार आहे.


सर्वेक्षणानुसार सरासरी सरासरी 45 ते 50 टक्के लोकसंख्येत अँटिबॉडीज आढळून आल्यात. म्हणजे पुणे हर्ड इम्युनिटीच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचलं आहे. 50 ते 70 टक्के अँटीबॉडीत आढळल्या तर पूर्ण हर्ड इम्युनिटी प्राप्त होते.