

भारताने न्यूझीलंडमध्ये 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतून भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलने पदार्पण केलं. 19 वर्षीय शुभमन गिलला पदार्पणाच्या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. पहिल्या सामन्यात त्याला फक्त 9 धावाच करता आल्या.


पदार्पणाच्या सामन्यात अपयशी ठरलेला शुभमन हा काही पहिलाच फलंदाज नाही. भारताचा 'द वॉल' समजला जाणारा माजी फलंदाज राहुल द्रविडदेखील पदार्पणाच्या सामन्यात 3 धावांवर बाद झाला होता. त्याने श्रीलंकेविरुद्ध 1996 मध्ये पदार्पण केले होते. राहुल द्रविडने क्रिकेट कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यात दहा हजार 889 धावा केल्या आहेत.


माजी सलामीवीर गौतम गंभीर याने 2003 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गंभीर पदार्पणाच्या सामन्यात 22 चेंडूत 11 धावाच काढू शकला.


रनमशिन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीदेखील त्याच्या पहिल्या सामन्यात 12 धावांवर बाद झाला होता. विराटने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सर्वात वेगवान 10 हजार धावा करण्याचा विक्रम त्याने केला आहे.


बेस्ट फिनीशर आणि भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर भारताने त्याच्या नेतृत्वाखाली तिन्ही प्रकारात जगात एक नंबरचे स्थान पटकावलं. भारताने आयसीसीचा एकदिवसीय आणि टी20 विश्वचषक त्याच्याच नेतृत्वाखाली जिंकला.


क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिनची पदार्पणाची कहाणी धोनीपेक्षा वेगळी नाही. सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी पदार्पणाचा सामना भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असेलेल्या पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याला वकार युनुसने शून्यावर बाद केलं होतं. त्यानंतर मात्र सचिनने इतके विक्रम केले की त्याला विक्रमादित्य म्हटलं जाऊ लागलं.


आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला विरेंद्र सेहवागला पदार्पणाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध एका धावेवर बाद व्हावे लागले होते. भारताकडून कसोटीत पहिले त्रिशतक आणि एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा फलंदाज ठरला होता.