

वेस्ट इंडिजविरोधात पदार्पणात शतकी खेळी खेळणारा पृथ्वी शॉ स्वतःच्या नावावर अजून एक रेकॉर्ड करण्यास अपयशी ठरला. पृथ्वी दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात ७० धावा करून बाद झाला.


दुसऱ्या डावातही शतक झळकवण्याचं त्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पृथ्वीच्या आधी दोन भारतीय खेळाडूंनी पदार्पणातील पहिल्या दोन कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे.


यात सर्वात पहिलं नाव येतं ते भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली. गांगुलीने इंग्लंडविरोधात लॉर्ड्स मैदानावर पदार्पणातील कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. गांगुलीला या सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती.


गांगुलीने यानंतर ट्रेंटब्रिज मैदानात खेळल्या गेलेल्या सामन्यात पुन्हा एकदा शतकी खेळी खेळली होती. अशापद्धतीने क्रिकेटमधील दादाने करिअरच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात शतक झळकावले होते.


या यादीत दुसरं नाव आहे ते मुंबईचा रोहित शर्मा. रोहितने ईडन गार्डनवर खेळण्यात आलेल्या वेस्ट इंडिजविरोधातील कसोटी सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. पदार्पणातील पहिल्या सामन्यात रोहितने दमदार शतक ठोकले. या सामन्यात रोहितला दुसऱ्यांदा खेळण्याची संधी मिळाली नाही.


मात्र रोहितने वानखेडेमध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा शतकी कामगिरी केली. रोहितच्या या खेळीने भारताने तो कसोटी सामना सहजरित्या जिंकला होता.


पृथ्वी शोनेही पदार्पणातील पहिल्या सामन्यात शतकी खेळी खेळली. पण त्याच सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.