

करूणानिधी या नावाशिवाय तामिळनाडूचं राजकारण पूर्णच होऊ शकत नाही. 78 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी देशाच्या राजकारणातही अनेकदा मुख्य भूमिका बजावली.


मुत्तुवेल करूणानिधि या नावाभोवती गेली सहा दशकं तामिळनाडूचं राजकारण फिरतंय. 60 वर्षांच्या कारकिर्दीत पाच वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद हे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचं गमक सांगून जातंय. 3 जून 1924 ला जन्मलेले करूणानिधी तमिळ सिनेमा जगतात एक प्रसिद्ध नाटककार आणि पटकथा लेखक म्हणून ख्यातकिर्त होते. कलाईनार अर्थात कलेतला विद्वान या टोपणनावानंही ते तामिळ जनतेत लोकप्रिय होते.


रामास्वामी पेरियार यांनी जात आणि लिंग आधारित भेदभावाविरोधात सुरू केलेलं द्रविड आंदोलन प्रसिद्ध आहे. याच द्रविड आंदोलनाशी प्रभावित होऊन करूणानिधी पुढे आले.


1957 साली पहिल्यांदा ते तामिळनाडू विधानसभेवर निवडून गेले. 1969 मध्ये तत्कालीन डीएमके अध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर ते डिएमकेचे प्रमुख बनले आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले.


त्यानंतर 1971, 1989, 1996 आणि 2006 असं पाच वेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. 1957 पासून आजतागायत करूणानिधी सलग बारा वेळा विधानसभेवर निवडून आले. केंद्रातल्या यूपीए सरकारमध्येही त्यांच्या पक्षानं महत्त्वाची भूमिका पार पाडली.


भ्रष्टाचाराचे आरोप, प्रभू रामाविषयीचं वादग्रस्त वक्तव्य, दहशतवादी संघटना लिट्टेसोबतच्या संबंधावरून ते अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रकृतीच्या अनेक तक्रारी आणि शारिरीक व्याधींचा सामना करत करूणानिधींनी तामिळनाडूमध्ये आपला पक्ष जोमानं वाढवला.


तामिळी जनतेनेही या कलंदर कलावंतावर निरातिशय प्रेम केलं. पण आपल्या कुटुंब कबिल्याच्या मोहापासून स्वत:ला ते दूर ठेवू शकले नाहीत.


करुणानिधी यांची तीन लग्न झाली होती. त्यांची पहिली पत्नी पद्मावती, दुसरी पत्नी दयालू अम्माल आणि तिसरी पत्नी रजती अम्माल अशी त्यांची नाव आहे. त्यांची पहिली पत्नी पद्मावती यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात चार मुलं आणि दोन मुली आहे. एमके मुथू हे पद्मावती यांचा मुलगा आहे. तर एमके अलागिरी, एमके स्टालिन, एमके तमिलरासू आणि बेटी सेल्वी हे दयालू अम्मल यांची मुलं आहे. त्यांची तिसरी पत्नी रजती अम्माल याची मुलगी कनिमोझी आहे.