

नोकरीमधून मिळणाऱ्या पगारात बचत करणं म्हणज कर्मकठीण काम. सगळ्यांनाच असं करणं जमतं असं नाही. फार कमी लोकं हे करू शकतात. आर्थिक नियोजन, योग्य ठिकाणी गुंतवणूकीने तुम्ही लाखो रुपयांची बचत करु शकतात. अशाच एका योजनेबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या योजनेत गुंतवणूक करणं फार फायदेशीर आहे. पोस्ट ऑफिसची ही योजना आहे.


आपल्या रोजच्या खर्चातून जर तुम्ही 100 ते 150 रुपये वाचवत असाल तर ही योजना तुमच्याचसाठी आहे. पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या योजनेअंतर्गत रोज 150 रुपयांची गुंतवणूक केली तर 20 वर्षांच्या नोकरीत तुम्हाला अतिरिक्त 20 लाखांचा फंड मिळेल.


उदाहरणार्थ- 25 व्या वर्षी जर तुम्ही नोकरीला लागलात आणि तुमचा पगार 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत आहे तर सुरूवातीला दुसरीकडे गुंतवणूक करण्यापेक्षा दररोज 100 ते 150 रुपयांएवढी बचत केली जाऊ शकते. ही बचत 45 व्या वर्षी तुम्हाला अधिक 25 लाख रुपये देईल. म्हणजे नोकरी करतानाच तुम्ही वयाच्या 45 व्या वर्षी तुमच्या हाती 25 लाख रुपये असतील. दररोज 100 ते 150 रुपयांची बचत करणं फार कठीण नसते. तुम्ही नोकरी बदलली तर हे अजून सोप्प होऊन जातं.


पीपीएफमध्ये करा गुंतवणूक- पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ अकाऊंट सुरू करण्याची सोय आहे. 15 वर्षांसाठी हे अकाऊंट सुरू ठेवता येतं. 15 वर्षांनंतर पुढील 5 वर्ष तुम्ही हे अकाऊंट वाढवून घेऊ शकतात. सध्या पीपीएफवर 7.6 टक्के व्याज आहे. पीपीएफमध्ये कमीत कमी 100 रुपयांपासून अकाऊंट सुरू करता येते. या अकाऊंटमध्ये वर्षभरात किमान 500 रुपये असणं बंधनकारक आहे तसेच एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक करता येते.


20 वर्षांत मिळवाल 25 लाख रुपये- जर तुम्ही 150 रुपयांनुसार दररोज पीपीएफमध्ये गुंतवणूक करत आहात तर तुम्ही महिना 4500 रुपयांची गुंतवणूक करत आहात. तसेच वर्षभरात तुम्ही 54 हजार रुपयांची गुंतवणूक कराल. तर 20 वर्षांत एकूण 10 लाख 80 हजारांची तुमची गुंतवणूक होईल. या रुपयांवर 7.6 टक्के व्याजावर 20 वर्षांत सर्वसाधारणपणे 25 लाख 44 हजार रुपये मिळतील. म्हणजे तुमच्या एकूण गुंतवणूकीवर 14 लाख 64 हजार रुपये अधिक मिळतील.


5 वर्षांत 15.30 लाख- जर तुम्ही दररोज 150 रुपयांची गुंतवणूक पीपीएफमध्ये केली तर 15 वर्षांत तुमची गुंतवणूक 8 लाख 10 हजार रुपयांपर्यंत होते. या रकमेवर 7.6 टक्के व्याज दराने तुम्हाला 15 लाख 30 हजार रुपये मिळतात. म्हणजे तुम्हाला साधारणपणे 7 लाख 19 हजार रुपये अधिक मिळतात.


पीपीएफ अकाऊंटचे फायदे- फक्त 100 रुपयांमध्ये हे अकाऊंट सुरू करता येते. यात तुम्ही जॉईंट अकाऊंटही सुरू करू शकता. अकाऊंट सुरू करताना यात नॉमिनेशनची सोय उपलब्ध आहे. 15 वर्षांचा कालावधी संपल्यानंतरही तुम्ही दोन वेळा 5- 5 वर्षांसाठी हे अकाऊंट रिन्यू करू शकता. तसेच यातून मिळणारे उत्पन्न हे पूर्णपणे टॅक्स- फ्री असते. या योजनेचा फायदा म्हणजे तीन वर्षांनंतर या अकाऊंटवर कर्जही देण्यात येते.