इंडियन प्रीमियर लीग 2020 (आयपीएल 2020) चे ग्रुप स्टेजचे आता काहीच सामने बाकी राहिले आहेत. या सिझनमध्ये अनेक संघांच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली त्यामुळेच या वेळेस लीगचे अंतिम सामने येईपर्यंत प्लेऑफच्या टीमची निवड झालेली नव्हती. परंतु काही खेळाडू असेदेखील आहेत ज्याच्या खराब कामगिरीमुळे त्यांच्या फॅन्सच्या पदरी निराशा पडली. त्यांच्या खराब खेळामुळे पुढच्या वर्षी संघ खरेदीवेळी त्यांना भारी नुकसान होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया अशा 5 खेळाडूंची नावं ज्यांच्यावर बोली लावण्यासाठी पुढच्या वर्षीच्या लिलावात संघ मालक कदाचित कचरतील.
केदार जाधव (Kedar Jadhav) -आयपीएल 2020 स्पर्धा पुणेकर केदार जाधवसाठी अत्यंत वाईट ठरली आहे. जेव्हा जेव्हा हा 35 वर्षीय खेळाडू क्रीजवर आला तेव्हा त्याने आपल्या चेन्नई संघाचा पराभव करण्यास मदतच केली. कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात जाधवने केलेली १२ चेंडूत ७ धावांची जोरदार खेळी कोणालाही विसरता येणार नाही. 7.8 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या या खेळाडूने 8 सामन्यांत अवघ्या 62 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेटही 93 .93 असा होता. संपूर्ण मोसमात जाधवने एकही षटकार ठोकला नाही. त्यामुळे आता कदाचित आयपीएल 2021 साठी कोणताही संघ त्याच्यावर बोली लावणार नाही.
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटवरदेखील कोणताही संघ बोली लावण्याची शक्यता कमी आहे. 11.05 कोटींच्या किमतीला खरेदी केल्या गेलेल्या उनाडकटने या हंगामात 7 सामन्यांमध्ये 228 धावा देत 4 बळी घेतले आहेत. राजस्थानने त्याला काही सामन्यांमध्ये विश्रांती दिली आणि त्याच्याजागी कार्तिक त्यागीला संधी देण्यात आली त्याने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी बजावली आहे.
आयपीएल 2020 मध्ये अजिंक्य रहाणेनेही टीम दिल्ली कॅपिटला आपल्या कामगिरीने निराश केले आहे. रहाणेला दिल्लीने 5 सामन्यांत संधी दिली परंतु 10.20 च्या सरासरीने केवळ 51 धावा करू शकला. रहाणेचा स्ट्राइक रेटही फक्त 94 होता. अशा परिस्थितीत आयपीएल 2021 च्या बोलीमध्ये राहणेला कोणत्याही संघाने खरेदी करणं अवघड वाटतंय.