मधुमेही रुग्णांसाठी इन्सुलिनचं इंजेक्शन महत्त्वाचं असतं. मात्र हे इंजेक्शन घेताना योग्य ती काळजी घ्यावी लागते. त्यापैकी एक म्हणजे इंजेक्शनची सुई एकदाच वापरायची असते, त्या सुईचा पुनर्वापर करायचा नसतो.
2/ 11
मात्र तरीदेखील परवडत नसल्यानं अनेक मधुमेही रुग्ण इन्सुलिनच्या एकाच सुईचा पुनर्वापर करतात. भारतातील 90 टक्के मधुमेही इन्सुलिन सुईचा पुनर्वापर करतात, असं फोरम ऑफ इंजेक्शन टेक्निक आणि थेरेपी एक्सपर्ट रेकमेंडेशनने 2017 साली केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं होतं.
3/ 11
संशोधकांनी रुग्णालयात दाखल असलेल्या 45 मधुमेही रुग्णांचे प्रत्येकी 15 असे 3 गट केले. या रुग्णांना दिवसातून 3 वेळा इन्सुलिन घ्यावं लागत होतं.
4/ 11
पहिल्या गटाला एक सुई एकदाच वापरण्यास सांगितली, दुसऱ्या गटाला एक सुई 4 दिवस म्हणजे 12 वेळा वापरण्यास सांगितली आणि तिसऱ्या गटाला 7 दिवस म्हणजे 21 वेळा वापरण्यास सांगितली.
5/ 11
तज्ज्ञांच्या देखरेखीत या सुई बदलण्यात आल्या. 7 दिवस या सर्वांचं निरीक्षण करण्यात आलं. सुईवरील बॅक्टेरिया, वेदना आणि इंजेक्शन घेतलेल्या जागेवरील बदल तपासण्यात आला.
6/ 11
सुईचा पुनर्वापर केल्याने सुईवरील बॅक्टेरिया वाढतात आणि वेदनादेखील जास्त होतात, असं संशोधकांना दिसून आलं.
7/ 11
जी सुई एकदाच वापरली गेली त्यावर बॅक्टेरिया सर्वात कमी म्हणजे 26.6% होते. तर सर्वात जास्त वेळा म्हणजे तिसऱ्या गटातील व्यक्तींच्या सुईवर सर्वात जास्त म्हणजे 33.3% बॅक्टेरिया होते.
8/ 11
पहिल्या गटापेक्षा दुसऱ्या गटामध्ये चौथ्या दिवशी वेदना जास्त होत्या, तर तिसऱ्या गटाला सातव्या दिवशी सर्वाधिक वेदना जाणवल्या.
9/ 11
याबाबत न्यूज 18 लोकमतशी बोलताना मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे म्हणाले, सुईचा पुनर्वापर केल्यानं इन्फेक्शन होऊ शकतं, तसंच सातत्याने वापरल्याने त्यावरील टेफलॉन कोटिंग कमी होतं आणि त्यामुळे वेदना होतात.
10/ 11
इन्सुलिन इंजेक्शनची सुई एकदाच वापरायची असते मात्र अनेकांना इन्सुलिनची सुई बदलणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, त्यामुळे काही वेळा एकच सुई पुन्हा वापरण्यास आम्ही परवानगी देतो, असं डॉ. गाडगे म्हणाले.
11/ 11
मात्र सुईचा पुनर्वापर करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. फार फार तर 4 वेळा एक सुई वापरता येते. 4 वेळा सुई वापरण्याआधीच जर वेदना होऊ लागल्या तर तात्काळ सुई बदला. शक्यतो परवडत असेल तर एक सुई एकदाच वापरा, असा सल्ला डॉ. गाडगे यांनी दिला आहे.